नाना पाटेकरांच्या कार्याला श्रमदानातून श्रद्धांजली; काळसे येथे जलसंवर्धनाचा संदेश

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील काळसे येथे नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे संवर्धन आणि त्याचा सुयोग्य वापर करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून नाल्यातील गाळ काढण्याचे श्रमदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांसह शिवाजी विद्यामंदिर काळसे येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

जलसंवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना यावेळी प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक भागांत नद्या-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि विविध जलसंधारणाची कामे करून त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागाची चळवळ उभी केली. त्यांच्या याच कार्याची आठवण ठेवत काळसे येथे प्रत्यक्ष श्रमदान करून त्यांना आगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

काळसे गावातील नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक प्रभावीपणे टिकवून ठेवण्यासाठी नाल्यात साचलेला गाळ काढण्यात आला. उपलब्ध जलस्रोतांचा स्थानिक पातळीवर अधिक चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा, पावसाचे पाणी वाहून न जाता त्याचे संधारण व्हावे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, या उद्देशाने अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

विशेष म्हणजे, या श्रमदानात शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. जलसंधारणाचे महत्त्व केवळ पुस्तकी ज्ञानातून न समजावता प्रत्यक्ष श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जलस्रोत संवर्धनाचा अनुभव देण्यात आला. जलस्रोतांची स्वच्छता, पाण्याचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.पाणी ही भविष्यातील सर्वात मोठी गरज असून, जलस्रोतांचे संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लोकसहभागातून अशा छोट्या-छोट्या उपाययोजना सातत्याने राबवल्यास त्याचा मोठा परिणाम जलसंधारणाच्या दृष्टीने साध्य होऊ शकतो, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

या श्रमदानात काळसे ग्रामस्थ, शिक्षक तसेच कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, सरपंच विशाखा काळसेकर, मुख्याध्यापक अविनाश परब, माजी सभापती राजेंद्र परब, शिक्षक प्रथमेश देसाई, स्नेहा सरमळकर यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!