
‘विकास देशाचा, विकास कोकणचा, विकास माझ्या गावचा’चा नारा; ‘गाव चलो’ अभियानातून जनतेशी थेट जोडण्याचे आवाहन
खेड : “प्रथम आपल्या गावाच्या विकासाचा संकल्प करा. सामान्य नागरिकांचा विकास झाला, तरच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याचे घर हे जनतेसाठी कार्यालय झाले पाहिजे,” असे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी खेड येथे केले.
‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या संकल्पनेतून आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा, सेवा ज्योती यात्रा’ कार्यक्रम खेड येथे उत्साहात पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहिले. त्यानंतर आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

खेड तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी ठोस आराखडा तयार करून तो प्रत्यक्षात आणण्याची गरज असल्याचे जठार यांनी सांगितले. “विकास देशाचा, विकास कोकणचा आणि विकास माझ्या गावचा,” हा मंत्र देत त्यांनी कार्यकर्त्यांनी केवळ संघटनात्मक कामापुरते मर्यादित न राहता खेडमधील गावागावांतील मूलभूत प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
‘गाव चलो’ अभियानाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचा, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करा, असेही त्यांनी सांगितले. गावाच्या गरजा ओळखून स्थानिक पातळीवर विकासाचे नियोजन केल्यास खेडच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा नेते वैभव खेडेकर, गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, युवामोर्चा प्रदेश सचिव मिलिंद नांदगावकर, पदवीधर प्रदेश सचिव अजय दळवी, खेड दक्षिण मंडल अध्यक्ष विनोद चाळके, खेड उत्तर मंडल अध्यक्ष ऋषीकेश मोरे, धनंजय यादव, खेड नगरसेविका वैभवी खेडेकर, दापोली शहर मंडल अध्यक्ष जया साळवी, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगुडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Subscribe to my channel






