Malvan | पोलिसांची शोधमोहीम यशस्वी : ‘तो’ चिमुकला आईच्या स्वाधीन !

रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा गेला होता घराबाहेर

मालवण : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि कुठून आला, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात असताना या मुलाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी मालवण पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी देखील शोधमोहीम राबवली. या शोध मोहिमेला यश आले असून या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रात्री घराचा दरवाजा उघडा असताना हा मुलगा घराबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी पहाटेच्या अंधारात दीड ते दोन वर्षांचा लहानगा मुलगा काही भटक्या कुत्र्यांच्या विळख्यात सापडला होता. सुदैवाने, कुत्र्यांनी घेरलेले असतानाही त्याला कोणतीही दुखापत झाली नाही आणि स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तो सुखरूप वाचला. या घटनेमुळे संपूर्ण मालवण परिसरात खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बालकाला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत बालकाची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाले.हा मुलगा नेमका कोणाचा आहे आणि तो भरड परिसरात कसा पोहोचला, याचा शोध पोलिसांकडून सुरु होता. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन स्थानिक नागरिकांकडूनही माहिती संकलित केली जात होती. या बालकाची ओळख पटत असल्यास किंवा त्याच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मालवण पोलिसांनी केले होते. त्यानुसार नागरिक देखील या मुलाच्या पालकाचा शोध घेत असताना हा मुलगा एसटी स्टॅण्डच्या पाठिमागे राहणाऱ्या परप्रांतीय कामगार कुटुंबातील असल्याचे स्पष्ट झाले. रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा बाहेर गेला होता. अखेर मुलाच्या आईने मुलाला ताब्यात घेतले असून मालवण शहरातील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

error: Content is protected !!