
विरोधकांच्या उपसूचनेचा ४ विरुद्ध १४ मतांनी पराभव; बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांचा ठराव मंजूर
मालवण : मालवण शहराच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकावरून मालवण नगरपालिकेतील राजकीय वातावरण सोमवारी चांगलेच तापले. शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर आयोजित विशेष सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी उपसूचनेद्वारे योजनेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले; मात्र सत्ताधारी गटाने बहुमताच्या जोरावर सुधारित अंदाजपत्रकाचा ठराव १४ मतांनी मंजूर केला. विरोधकांची उपसूचना ४ विरुद्ध १४ मतांनी फेटाळण्यात आली. त्यामुळे नळपाणी योजनेवरून पालिकेतील सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी नगरपालिकेची विशेष सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात उपस्थित होते. मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत करण्याच्या कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचा महत्त्वपूर्ण विषय सभेच्या अजेंड्यावर होता. सत्ताधारी भाजपच्या वतीने नगरसेवक ललित चव्हाण यांनी ठराव मांडला, तर मंदार केणी यांनी त्याला अनुमोदन दिले. दुसरीकडे, विरोधी गटाच्या वतीने मंदार ओरसकर यांनी उपसूचना मांडत योजनेतील तांत्रिक बाबी, कामाच्या पद्धती आणि सविस्तर प्रकल्प अहवालाबाबत प्रश्न उपस्थित केले. अखेर मतदानात सत्ताधाऱ्यांनी बाजी मारत ठराव मंजूर करून घेतला.
चर्चेविना ठराव घेण्यावरून वादाची ठिणगी!
नळपाणी योजनेसारख्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषयावर सविस्तर चर्चा व्हावी, अशी भूमिका विरोधकांनी मांडली. मात्र, सत्ताधारी गटाकडून थेट मतदान घेण्याचा आग्रह धरल्याने सभागृहात वादाची ठिणगी पडली. महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर यांनी आक्रमक भूमिका घेत योजनेच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. योजनेतील त्रुटी, तांत्रिक सल्लागार समितीची भूमिका आणि प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक असल्याचे विरोधकांनी सांगितले. दुसरीकडे, सत्ताधारी गटाने योजना पूर्ण करण्याबाबत ठाम भूमिका मांडत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
तांत्रिक सल्लागार समितीवर ओरसकरांचे गंभीर आरोप
विरोधी नगरसेवक मंदार ओरसकर यांनी नळपाणी योजनेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समितीतील एका सदस्याने या योजनेशी आपला संबंध नसल्याचे कळविल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, समितीच्या सदस्यांच्या नातेवाईकांच्या हितसंबंधांबाबतही त्यांनी आरोप केले. नळपाणी योजनेचे पाईप रस्त्यालगत घालणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नसल्याचा दावा करत, प्रत्यक्ष काम सविस्तर प्रकल्प अहवालानुसार झाले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भविष्यात भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून वीजखांबांवरील लाईनचा उपयोग होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवालच चुकीचा असल्याचा आरोप विरोधकांनी उपसूचनेतून केला. या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा न झाल्याबद्दल महेंद्र म्हाडगुत आणि तपस्वी मयेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
केणी, बापर्डेकर यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
सत्ताधारी गटाच्या वतीने मंदार केणी यांनी ठराव मतदानाला घेण्याची भूमिका ठामपणे मांडली. त्यांनी प्रशासनाला मतदान घेण्याबाबत वारंवार सूचना केल्या. राजकोट परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी प्रत्युत्तर दिले. “माझ्या प्रभागात पाणीपुरवठा होत आहे. नळपाणी योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत,” अशी भूमिका बापर्डेकर यांनी मांडली. सत्ताधारी गटाने योजना पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला, तर विरोधकांनी कामाच्या गुणवत्तेसह तांत्रिक बाबींवर स्पष्टता मिळण्याची मागणी कायम ठेवली.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी विरोधकांना उपसूचना मांडण्यासाठी वेळ दिल्यानंतर ठरावावर मतदान घेण्यात आले. यात सत्ताधारी गटाने १४ मतांच्या जोरावर ठराव मंजूर केला, तर विरोधकांची उपसूचना ४ विरुद्ध १४ मतांनी फेटाळण्यात आली.
या सभेत सत्ताधाऱ्यांनी संख्याबळ सिद्ध केले असले, तरी मालवण शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न आणि योजनेच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित झालेल्या शंकांना आता प्रशासनाकडून कितपत स्पष्ट उत्तरे मिळतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ठराव मंजूर होणे ही प्रशासकीय प्रक्रियेतील एक पायरी असली, तरी योजनेचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊन नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे, हेच या संपूर्ण घडामोडींचे खरे फलित ठरणार आहे.
या विशेष सभेला सत्ताधारी गटाकडून सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, अन्वेषा आचरेकर, भाग्यश्री मयेकर, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर आणि पूनम चव्हाण, तर विरोधी गटाकडून महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर आणि अनिता गिरकर उपस्थित होते.




Subscribe to my channel




