विरोधकांच्या पाया खालची वाळू घसरली ; मतदारांनी भाजपला साथ द्यावी ; जनतेच्या समस्यांची जाणीव असल्याने दूरदृष्टीने काम करणार


राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही ; शिल्पा खोत यांची ग्वाही
मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही वाडी-वस्ती फिरत असताना लहान-थोर, मोठ्यांचा आशीर्वाद घेत आहोत. आम्हाला सर्वत्र एक छान आणि उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. यामुळे शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही असे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान काही विरोधक माझ्या जात प्रमाणपत्रावर कुठेतरी प्रश्न निर्माण करून लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहेत. प्रत्यक्षात जात प्रमाणपत्र पूर्णपणे वैद्य आहे आणि याला निवडणूक समितीनेही वैद्य ठरवलेले आहे असेही सौ. खोत यांनी सांगितले.
येथील भाजप कार्यालयात पत्रकार ही परिषद झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आदी उपस्थित होते. सौ. खोत म्हणाल्या, पर्यटन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या मालवण शहरात काम करून दाखवण्याची आपली तीव्र इच्छा आहे. निवडून आल्यावर आपण जनतेचे प्रश्न नक्की सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सेवाभावी संस्थेत कार्यरत असल्याने आपल्याला जनतेच्या समस्यांची जाणीव आहे. दूरदृष्टी असणारे आमचे सर्व नेते आहेत आणि मी स्वतः दूरदृष्टी असणारी आहे. यापूर्वी भाजपने वेंगुर्ला आणि अन्य शहरांमध्ये केलेले चांगले काम मालवणमध्येही दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांसारख्या नेत्यांचे पाठबळ व आशीर्वाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.मालवणची जनता सुज्ञ आहे. ती या संभ्रमावस्थेकडे अजिबात लक्ष देणार नाही. जनता विकास आणि विकासाची धोरणे याला महत्त्व देत आहे. जे काही खोटं-नाटं पसरवत आहेत, त्यावर लक्ष न देता येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगली साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Subscribe to my channel




