मालवण : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात गाडी पार्किंग करून नाट्यगृहाच्याच पायऱ्यांवर बसून भर दुपारी दारू पार्टी करणाऱ्या पर्यटक तरुणांना मालवणमधील जागरूक नागरिक व नाट्यप्रेमींनी रोखत त्यांची दारू पार्टी उधळून लावली. तसेच मालवणी शैलीत खडे बोल सुनावले.
मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका पर्यटक ग्रुपने आपली गाडी पार्क केली. या गाडीतील काही तरुणांनी गाडीतून उतरून नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर बसून दारू पिण्यास सुरुवात केली. तसेच दारूच्या बाटल्याही नाट्यगृह परिसरात टाकल्या. हा प्रकार लक्षात येताच मालवणमधील काही जागरूक नागरिक व नाट्यप्रेमी यांनी त्याठिकाणी धाव घेतली. मालवणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या मामा वरेरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर बसून दारू पार्टी सुरु असल्याचे पाहून नागरिक व नाट्यप्रेमी संतप्त बनले. त्यांनी त्या मद्यपी पर्यटक तरुणांची दारू पार्टी उधळून लावत कानउघडणी केली. तसेच त्या पर्यटकांना उठाबशा काढायला लावले. माफी मागण्यास भाग पाडून पुन्हा असे प्रकार करणार नाही असे त्यांच्या तोंडून वदवूनही घेतले. या घटनेची चर्चा मालवण शहरात सुरु होती.