DRDO चे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांचे प्रतिपादन


एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, सुकळवाड येथे ICASME–2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न
मालवण : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (MITM), सुकळवाड येथे “ICASME–2026” ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकीतील प्रगतीवर आधारित पहिली आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेचे उद्घाटन DRDO येथील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणी सांगितल्या. ११ मे १९९९ चा उल्लेख करत त्यांनी “जय जवान, जय किसान” सोबत “जय विज्ञान” ही संकल्पना तितकीच महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
देशाची प्रगती केवळ विज्ञानापुरती मर्यादित नसून अभियांत्रिकी, उत्पादनक्षमता आणि शिस्त यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञानाधारित विकासाची गरज त्यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमास विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. डॉ. जे. डब्ल्यू. बाकल (प्राचार्य, पिल्लई HOC अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय रायगड) यांनी आयोजन समितीचे अभिनंदन करत संशोधनात डेटा-आधारित दृष्टिकोनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ.विजयकुमार पवार यांनी अशा परिषदांमुळे ज्ञानाची देवाणघेवाण होऊन देशाच्या विकासाला चालना मिळते असे सांगितले.डॉ. आलम शेख (प्राचार्य वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड व्हीजुवल आर्ट मुंबई) यांनी ग्रामीण भागातील तांत्रिक विकासाचे महत्त्व अधोरेखित केले, तर डॉ. रमण बाणे (प्राचार्य यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सावंतवाडी) यांनी बहुविषयक संशोधन आणि मजबूत व्यावसायिक नेटवर्कची गरज व्यक्त केली.
डॉ. सुर्वसे (प्राचार्य, एसआरएम कॉलेज, कुडाळ) यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाशी नाते दृढ करण्यावर भर दिला. डॉ. महेश साटम यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशासोबत जीवनातील आनंद शोधण्याचे मार्गदर्शन केले.
मुख्य अतिथी डॉ. काशिनाथ देवधर यांनी भारताच्या अणुशक्ती राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर भाष्य करत विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी संरक्षण उत्पादन व निर्यात क्षेत्रातील भारताची प्रगती ही आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांनी आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवर, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे योगदानाबद्दल आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, उपप्राचार्य पूनम कदम, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे तसेच प्रा. डॉ. सचिन राजाध्यक्ष ( अधिव्याख्याता शासकिय तंत्रनिकेतन मालवण), प्रा. डॉ. एम. एन. शिवशरण ( sspm अभियांत्रिकी महाविद्यालयात कणकवली), प्रा. अनिरुद्ध झांटये, प्रा. हिनाली कोरगावकर, प्रा. सिद्धार्थ जाधव, प्रा. रोशनी वरक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. मृणाली कुडतरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी सौ.नेहा पाल, खजिनदार सौ.वृषाली कदम व विश्वस्त केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या.
















Subscribe to my channel




