… म्हणूनच आ. वैभव नाईकांकडून ठेकेदाराला दमबाजीची नौटंकी ; भाजपची टीका

गटार खोदाई करणे गरजेचे असताना आमदारसाहेब मुख्याधिकाऱ्यांना घेऊन पर्यटन महोत्सवात होते मग्न

प्रशासन, ठेकेदाराला जनतेसमोर धमकावून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा कारवाई करून दाखवा

भाजपचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांचे आव्हान

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण नगरपालिकेतील अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी शहर भाजपच्या वतीने माजी खासदार निलेश राणे सोमवारी ११ जुलै रोजी नगरपालिकेला भेट देणार आहेत. या बातमीमुळेच आ. वैभव नाईक यांनी मालवणात येऊन मुख्याधिकारी व ठेकेदाराला धमकावण्याची नौटंकी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप भाजपाचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पावसाळ्यापूर्वी मालवण शहरातील व्हाळी, गटारे खोदाई लवकरात लवकर केली पाहिजे म्हणून भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सतत नगरपालिकेमध्ये मागणी करत होते, पण आमदार साहेब त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांना घेऊन पर्यटन महोत्सव करण्यात मग्न होते, अशी टीका श्री. केनवडेकर यांनी केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहूनच व्हाळी व गटारे ठेकेदाराकडून साफ करून घ्यावीत, ही मुख्यत: मागणी असताना दहा मिनिटांसाठी फोटो सेशन करण्यासाठीच त्यांनी एका साइटवर जाऊन व्हाळीचे निरीक्षण केले व काम चांगल्या प्रकारे सुरू आहे, असे प्रसिद्धीस देऊन एसी केबिन मध्ये ते सुखरूप जाऊन बसले. असे असताना प्रशासनाला कामाला लावण्याचे धारिष्ट आमदारांनी दाखवले नाही. वेळोवेळी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी मुख्याधिकाऱ्यांकडून आपल्या वार्डातील थोडीफार कामे व्हावीत म्हणून मुख्याधिकाऱ्यांची तळी उचलत राहिले. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासाकडे पाहणे आवश्यक असताना वार्ड पुरतेच काम करून मुख्याधिकाऱ्यांच्या चुका डोळेआड करण्याचा प्रयत्न पदाधिकारी करत होते.

मालवण शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाबाबत भाजपा वर्षभर आवाज उठवत असताना ठेकेदाराला कधीही दंडात्मक कारवाई करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी धारिष्ठ दाखवले नाही. आमदारांच्या समोर ठेकेदार कामगार पुरवत नाहीत असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी लमाणी कामगार देऊ का ? असे विचारून आमदारांनी मुख्याधिकाऱ्यांना पाठीशी घातले होते. आता हेच आमदार ठेकेदारावर कारवाई करा म्हणून सांगत आहेत. आता ठेकेदाराचे बिल अदा करून झाले आहे. ठेकेदारावर कारवाई करून याचा जनतेला काय फायदा होणार, हे तरी आमदारांनी स्पष्ट करावे. ज्याप्रमाणे भुयारी गटार ठेकेदाराला महाराष्ट्रात काम करू देणार नाही अशी शिवगर्जना करणारे आमदार त्याच ठेकेदाराला त्याचे उर्वरित बिल देऊन टाका असे प्रशासनाला सांगत होते. हे पण जनतेने पाहिले आहे.

भाजपाचे आवाहन आहे की भुयारी गटाराचा ठेकेदार, कचरा उचलणारा ठेकेदार, व्हाळी व गटार साफ करणारा ठेकेदार यांची चौकशी करून त्यांच्या कामाचे जनतेकडून ऑडिट करून यांच्यावर आमदारांनी कारवाई करून दाखवावी. प्रशासनाला ठेकेदाराला जनतेच्या पुढ्यात धमकावून शेरेबाजी करून निव्वळ प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न करू नये. त्याचबरोबर सफाई कामगार, नगरपालिकेमधील ठेक्यातील कर्मचारी यांचा पगार ठेक्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे मिळतो की नाही हे पण पहावे. कंत्राटी सफाई कामगारांचा दीड दीड वर्ष पीएफ भरलेला नसताना ठेकेदारांची बिले कशी काढली याची पण पूर्ण चौकशी करून घ्यावी. मालवण नगरपालिकेचा अनागोंदी कारभार जनतेसमोर मांडण्यासाठी पुराव्यासह भाजपाच्या वतीने माजी खासदार निलेश राणे सोमवारी ११ जुलै रोजी नगरपालिकेत येऊन जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारणार आहेत, असे विजय केनवडेकर
यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!