Malvan | भाजपचा गड हादरला ; ठाकरे शिवसेनेने इज्जत राखली

चार जागांवर उबाठाचे उमेदवार विजयी ; नगराध्यक्ष उमेदवार पूजा करलकरही ठरल्या प्रभावी

सात जागांवर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार दोन नंबरवर ; प्रभाग ७ ब मध्ये गौरी मयेकर यांचा अवघ्या ४ मतांनी पराभव

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. या निवडणुकीत शहरातील जनतेने आमदार निलेश राणे यांच्या बाजूने कौल देत नगराध्यक्ष पदासह २० पैकी १० जागा शिवसेनेकडे दिल्या आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांच्या मते मालवण हा भाजपचा बालेकिल्ला म्हणवला जात होता. मात्र या निकालातून भाजपचा गड हादरल्याचे दिसून आले. १३ ते १४ जागांवर यश मिळण्याचा विश्वास बाळगून असलेल्या भाजपला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले. तर त्या तुलनेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची वानवा असलेल्या ठाकरे शिवसेनेने ४ जागांवर यश मिळवत आपली इज्जत राखली आहे. ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजा करलकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांना पिछाडीवर टाकत प्रभावी मते मिळवली आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांच्या एकहाती नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेने मिळवलेले हे यश निश्चितच दुर्लक्षित करण्याजोगे नाही.

ठाकरे शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यानी गेल्या काही कालावधीत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे शिवसेना कमकुवत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यानी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एकहाती किल्ला सांभाळला होता. त्यासाठी ते मालवणमध्ये ठाण मांडून होते. प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी प्रत्येक प्रभाग पिंजून काढला.

ठाकरे शिवसेनेचे विजयी उमेदवार

प्रभाग २ ब मध्ये ठाकरे शिवसेनेच्या अनिता गिरकर (४७० मते) यांनी भाजपच्या अमृता फाटक (३३४ मते) यांचा पराभव केला. प्रभाग ५ मध्ये ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत (४४८ मते) यांनी भाजपचे माजी नगरसेवक यतीन खोत (४०० मते) यांचा पराभव केला. प्रभाग ८ मध्ये युवासेनेचे तालुका समन्वयक मंदार ओरसकर (५२५ मते) यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या संतोष शिरगांवकर (२८९ मते) यांचा पराभव केला. तर प्रभाग १० मध्ये युवासेनेच्या तपस्वी मयेकर (६२४ मते) यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या सीताराम लुडबे (२८३ मते) यांचा पराभव केला.

error: Content is protected !!