देवबाग किनारपट्टीवरील बंधाऱ्यासाठी आ. वैभव नाईकांच्या प्रयत्नांतून सव्वा दोन कोटींचा निधी
शिवसेनेला श्रेय मिळू नये यासाठी भाजपकडून राजकारण सुरू : हरी खोबरेकर यांची टीका
निलेश राणेंच्या बंधाऱ्याबाबतच्या घोषणा हवेत विरणाऱ्या ; तळाशीलला १० कोटी देण्याची घोषणा हवेत विरली
कुणाल मांजरेकर
मालवण : देवबाग किनारपट्टीवर बंधारा उभारणीसाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून राज्य शासन बजेट अंतर्गत सव्वादोन कोटी निधीतून मोबार व अन्य अत्यावश्यक ठिकाणी बंधारा उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी निधी मंजूर होऊन महिन्याभरापूर्वी टेंडर प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र बंधाऱ्याचे श्रेय शिवसेनेस मिळेल म्हणून भाजपने राजकारण सुरू केल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्या बंधाऱ्या बाबत होणाऱ्या घोषणा या हवेतील घोषणा असतात, हे तळाशील वासीयांनी अनुभवले आहे. वर्षभरापूर्वी तळाशील किनारपट्टीवर १० कोटी निधी देणार असल्याची त्यांची घोषणा हवेत विरल्याची आठवण श्री. खोबरेकर यांनी करून दिली आहे.
आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून सुमारे ४ कोटी ५० लाख निधी तळाशील येथील बंधाऱ्यासाठी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रियाही झाली आहे. त्या बरोबर सर्जेकोट येथील बंधाऱ्यासाठीही सव्वा कोटी निधी मंजूर झाला आहे. आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्यक्षात कोट्यावधी रुपये निधी आणला आहे. विरोधक मात्र केवळ राजकारण करून आरोपच करत आहेत. १९९० साली राणेंच्या माध्यमातून बंधारा झाला. हे भाजपची मंडळी आता सांगत आहेत. मात्र १९९० ला आमदार असताना नारायण राणे शिवसेनेत होते. त्यामुळे तो बंधारा शिवसेनेच्या माध्यमातून झाला हे भाजपने विसरू नये. आजही मालवण किनारपट्टीवर कोट्यवधी निधीतून अनेक बंधारे मंजूर झाले. हे श्रेय शिवसेना, महाविकास आघाडी व आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याचे आहे. राज्य सरकार येथील जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे यापुढेही घेतच राहील. आता निवडणूक तोंडावर श्रेय घेण्यासाठी जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी बंधारा राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. केवळ राजकारण करून जनतेची दिशाभूल न करता भाजपने खासदार फंड व केंद्र सरकारच्या माध्यमातून विकासनिधी आणल्यास निश्चितच स्वागत आहे. ते जमत नसेल तर हवेतील घोषणा मात्र करू नये. आमचे मुख्यमंत्री व आमचे सरकार जनहित लक्षात घेऊन नेहमीच विकासासाठी कटिबद्ध राहतील, असे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.