डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे कार्यक्रमाचे आयोजन; संविधानातील हक्क, अधिकार आणि मूल्यांवर मार्गदर्शन
मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका मालवण यांच्या वतीने डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व अधिकार तसेच संविधानातील मूलभूत मूल्यांविषयी जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस नचिकेत पवार, संस्कार उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले, पर्यटन सचिव संदीप कदम, राजाराम कदम, वैभव पवार आदी उपस्थित होते.यावेळी बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांनी भारतीय संविधानातील नागरिकांचे हक्क, अधिकार आणि संविधानाने दिलेली मूल्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देत लोकशाही अधिक सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस नचिकेत पवार यांनी संविधानाचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी गावागावांतील शाखांच्या माध्यमातून संविधान जागृतीविषयक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. संविधानातील विचार, मूल्ये आणि लोकशाहीची जाणीव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.