चिवला बीचवर ‘धोक्याची घंटा’; बाबी जोगींच्या दणक्यानंतर विद्युत विभागाला जाग

मालवण : मालवण शहरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या स्वच्छ, सुंदर चिवला बीचवर गेल्या दहा दिवसांपासून विद्युत पोल व केबल जमिनीवर पडून असल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. समुद्राच्या भरतीचे पाणी विद्युत प्रवाहित केबलला लागत असल्याने मच्छीमार, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. शिवसेना मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत विद्युत विभागाकडे धाव घेतल्याने अखेर हा धोकादायक पोल व केबल हटविण्यात आली.

चिवला बीच हा मालवणच्या पर्यटनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून येथे पारंपरिक मच्छीमार रापण पातधारकांची मोठी लोकवस्ती आहे. स्वच्छ, सुंदर आणि पांढऱ्या चंदेरी वाळूमुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या बीचला भेट देतात. त्यामुळे या परिसरात स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि पर्यटकांची कायम मोठी वर्दळ असते.मात्र, गेल्या दहा दिवसांपासून माडाचे झाड पडल्याने विद्युत पोल व केबल तुटून जमिनीवर पडले होते. विशेष म्हणजे ही केबल विद्युत प्रवाहित असल्याने आणि समुद्राच्या भरतीचे पाणी तिच्या संपर्कात येत असल्याने कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या धोकादायक परिस्थितीची माहिती स्थानिक मच्छीमार व समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांना दिली. जोगी यांनी तात्काळ दखल घेत मालवण शहर अभियंता श्री. मयेकर यांची विद्युत विभागाच्या कार्यालयात भेट घेतली. पडलेला पोल तात्काळ हटवून त्या ठिकाणी नवीन पोल उभारावा, जमिनीवर पडलेली विद्युत केबल तातडीने सुरक्षित करावी आणि दुर्घटना घडण्याची वाट पाहू नये, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

“हा पोल आणि विद्युत केबल तात्काळ हटवली नाही तर मच्छीमारांना सोबत घेऊन जोरदार आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही बाबी जोगी यांनी विद्युत विभागाला दिला.या इशाऱ्यानंतर विद्युत विभागाने तातडीने कार्यवाही करत गेल्या दहा दिवसांपासून धोकादायक स्थितीत पडलेला विद्युत पोल व प्रवाहित केबल हटवली. तसेच त्या ठिकाणी नवीन पोल उभारण्याची कार्यवाही करण्यात आली. विद्युत विभागाच्या या तातडीच्या कारवाईमुळे चिवला बीचवरील संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. या प्रश्नाची तात्काळ दखल घेतल्याबद्दल स्थानिक मच्छीमार व नागरिकांनी बाबी जोगी यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!