दुग्धव्यवसायाच्या विस्तारासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सरसावली; शेतकऱ्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत देणार

जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट; दुग्ध संस्थांना मनीष दळवी यांचे आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेसंदर्भात आयोजित दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. या परिस्थितीत दुग्धव्यवसायासारखा शेतीपूरक व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना जोडून गट तयार करावा. अशा गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करता येईल, असे दळवी यांनी सांगितले.

अनुभवी शेतकऱ्यांची निवड करण्यावर भर

दुधाळ जनावरे खरेदी योजनेचे लाभार्थी निवडताना केवळ शासकीय निकषांचा विचार न करता दुग्धव्यवसायाची आवड, अनुभव आणि जनावरांची देखभाल करण्याची क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे. यंदा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करू शकणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या अनुभवाचा उपयोग करावा, असेही ते म्हणाले.

चारा, अनुदान आणि दूध संस्थांनाही मदतीचा विचार

जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार असून, चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबत विचार सुरू आहे. तसेच, सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून प्रत्येक दूध उत्पादकाला किमान २० हजार रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहकार्य देण्याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती दळवी यांनी दिली.

दूध संकलनात वाढ करणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबतही जिल्हा बँक सकारात्मक असून, यासंदर्भातील प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार आहे. “बँकेचा उद्देश नफा मिळवणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे,” असे सांगत, दुग्ध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे आवाहन दळवी यांनी केले.

या बैठकीला बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी आणि दुग्धव्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!