मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांचा सवाल : आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेत नेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार
मालवण : कोरोना काळात तात्पुरत्या कालावधीसाठी सागरी महामार्गावर नेण्यात आलेला आठवडा बाजार गेली पाच वर्षे त्याचठिकाणी कायम आहे. हा आठवडा बाजार सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत नेण्याची मागणी मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी मागील आठवड्यात तालुका प्रशासनाकडे केली आहे. आजच्या सोमवारी बाजारात गर्दी नसताना देखील या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेकदा निर्माण झाला. त्यामुळे तालुका प्रशासन आणि नगरपालिका सागरी महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे केव्हा लक्ष देणार? असा सवाल गॅरी अन्ननसिएशन यांनी केला आहे.
सागरी महामार्गावर भरणाऱ्या या आठवडा बाजारामुळे दर सोमवारी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा रुग्णवाहिकेला देखील येथून वाट काढताना कसरत करावी लागते. त्यामुळे सागरी महामार्गावर भरणारा आठवडा पूर्ववत सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत न्यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने मागील आठवड्यात मालवण तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आजच्या आठवडा बाजारात पावसामुळे गर्दी नसताना देखील सागरी महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावला. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेत हलवावा, अशी मागणी गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे.