जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी घेतला विरण शाखेच्या कामकाजाचा आढावा
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदिप उर्फ बाबा परब यांनी नुकतीच विरण शाखेला भेट देऊन कर्ज वितरण, कर्ज वसुली बाबतचा आढावा घेत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती अनिल कांदळकर उपस्थित होते. बँकेच्यावतीने शाखा व्यवस्थापक संजय पाताडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बॅक कर्मचारी आबा ठाकुर, रमेश चव्हाण, श्रीकांत नातु, महेश माळकर, अल्पबचत प्रतिनिधी अनिता सावंत आदी उपस्थित होते. यावेळी मसदे विरण येथील सतिश हनुमंत राठोड यांना विरण शाखेकडून कर्ज स्वरूपात देण्यात आलेल्या चार चाकी गाडीच्या चाव्या संचालक बाबा परब यांच्या हस्ते त्यांना देण्यात आल्या.
जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याची व गरजेची बँक ठरलेली आहे. या बँकेचा आर्थिक दर्जा उत्तम ठेवण्यासाठी सर्वानी काम केले पाहिजे. तसेच ग्राहकांना सौजन्याची वागणुक व तत्पर सेवा दिली पाहिजे, असे सांगून बँकेच्या सेवेबाबत कोणतीही तक्रार किंवा समस्या असल्यास आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन बाबा परब यांनी केले. शाखा व्यवस्थापक संजय पाताडे यांनी मान्यवरांचे आभार मानले.