तीनही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार : भाजपा जेष्ठ नेते विलास हडकर यांनी व्यक्त केला विश्वास


मालवण : मसुरे जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीचा झंझावाती प्रचार सुरु आहे. महायुतीच्या माध्यमातून विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढवली जात आहे. महायुतीच्या विकास कामांच्या जोरावर मसुरे जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार क्षमा हडकर, मसुरे पंचायत समिती उमेदवार संजय ठाकूर, कोळंब पंचायत समिती उमेदवार योजना कांबळी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास जेष्ठ भाजपा नेते विलास हडकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. महायुतीने जोरदार कंबर कसली आहे. मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा महायुतीच्या उमेदवार क्षमा हडकर, मसुरे पंचायत समितीचे उमेदवार संजय उर्फ छोटू ठाकूर, आणि कोळंब पंचायत समिती मतदार संघातून योजना कांबळी या निवडणूक रिंगणात आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन तिन्ही उमेदवारांनी घरोघर प्रचारावर भर दिला आहे. आज हडी येथील मार्गेश्वर देवस्थान येथे श्रीफळ ठेवून तसेच गावातील अन्य मंदिरात पूजन करून महायुतीच्या माध्यमातून हडी गावात प्रचार करण्यात आला. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते विलास हडकर, भाजपा तालुका सरचिटणीस तथा माजी सरपंच महेश मांजरेकर, जिल्हा परिषद सदस्य पदाच्या उमेदवार क्षमा हडकर, कोळंब पंचायत समितीच्या उमेदवार योजना कांबळी यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विलास हडकर म्हणाले, ही निवडणूक जिल्ह्यात महायुतीच्या बाजूने एकतर्फी आहे. महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने प्रचार करत आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामीण भागात असणारे लोकप्रतिनिधी हे केंद्र व राज्य सरकारच्या महायुतीच्या विचाराचे असले तर विकास अधिक गतिमान होणार आहे. जनतेचा कौल ही महायुतीच्या बाजूने आहे. निवडणुकी पूर्वी महायुतीचे 25 सदस्य बिनविरोध विजयी झाले.
जिल्ह्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वास विलास हडकर यांनी व्यक्त केला आहे.

Subscribe to my channel




