मालवणात “महा”विकास आघाडीच्या “महा”वितरणची थकीत वीज बिलांसाठी “महादादागिरी” !
तात्काळ वीज बील भरा, नाहीतर कनेक्शन तोडणार ; पार्ट पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय
महावितरणने दादागिरी थांबवावी, नाहीतर भाजप आंदोलन छेडणार : अशोक सावंतांचा इशारा
कुणाल मांजरेकर
मालवण : कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. व्यावसायिक देखील संकटात आले असून अशा परिस्थितीमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या महावितरण कंपनीने थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महादादागिरी सुरू केली आहे. पार्टपेमेंट स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या ग्राहकांकडूनही थकीत वीज बिले टप्प्याटप्प्याने न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून थकीत असलेले वीज बिल तात्काळ भरा, नाहीतर वीज कनेक्शन तोडणारच, अशी दमबाजी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून सुरू आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी महावितरणच्या महा दादागिरी बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने ही दादागिरी थांबवावी आणि ग्राहकांकडून टप्प्याटप्प्याने वीज बिले भरून घ्यावीत, नाहीतर भाजपला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा श्री. सावंत यांनी दिला आहे.
गणेश चतुर्थी कालावधीत थकीत वीज बिलांच्या वसुलीची मोहीम थांबवण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरण कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र अनंत चतुर्दशी च्या दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा एकदा महावितरणने वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. मात्र यावेळी महावितरणने “महा दादागिरी” सुरू केल्याचे चित्र मालवण तालुक्यात दिसून येत आहे. काही ग्राहकांनी गणेश चतुर्थी पूर्वी महावितरणची थकीत बिलांतील अर्धी रक्कम भरणा केली असतानाही अशा ग्राहकांना देखील उर्वरित रक्कम तात्काळ भरा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण वीज बील तात्काळ न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
… तर भाजप आंदोलन छेडणार : अशोक सावंत
महावितरण कंपनीच्या “महादादागिरी” वर भाजपने आक्षेप घेतला आहे. जर एखादा ग्राहक काहीच रक्कम भरत नसेल तर महावितरणने कारवाई करावी. मात्र वीज ग्राहक रक्कम टप्प्याटप्प्याने भरत असतील तर त्यांना सवलत देण्यात यावी. चुकीच्या पद्धतीने दादागिरी करून एकाही वीज ग्राहकाचे कनेक्शन तोडल्यास भाजपला महावितरण कार्यालयावर मोर्चा आणावा लागेल, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी दिला आहे. दरम्यान, महावितरणच्या या महादादागिरीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणचे कंत्राटी कामगार उद्या एखाद्या वीज ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्यास गेले असताना त्याठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे देखील अशोक सावंत यांनी लक्ष वेधले आहे.
हॉटेल व्यावसायिक संकटात !
कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय संकटात आला आहे. दीड ते दोन वर्ष हॉटेल बंद असून हॉटेलचा मेंटेनन्स, कामगारांचे पगार, बँकांचे हप्ते यांमुळे हॉटेल व्यावसायिक संकटात आहेत. शासनाने आता ५० % तत्वावर हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली असून ही हॉटेल सुरू करताना हॉटेल व्यावसायिकांना मेंटेनन्स साठी लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे. या परिस्थितीत महावितरण कंपनीच्या वसुली मोहिमेने हॉटेल व्यवसायावर संकट ओढवले आहे. वीज बिल भरण्यासाठी आमचा नकार नाही, मात्र महावितरणने किमान दोन ते तीन टप्प्यात बिले भरून घ्यावीत, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.