नेरूरच्या श्री देव कलेश्वर मित्रमंडळाने पटकावला प्रथम क्रमांक; केळबाई मित्रमंडळ द्वितीय, तर कुडाळ बाजारपेठ तृतीय
कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या पुरस्कृत आणि कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित भव्य नरकासुर वध स्पर्धेला स्पर्धकांसह प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेनेच्या या उपक्रमात नेरूर येथील श्री देव कलेश्वर मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. कुडाळ येथील श्री देवी केळबाई मित्रमंडळाने द्वितीय, तर कुडाळ बाजारपेठेने तृतीय क्रमांक मिळवला.
आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेला आणि पुरस्कृत उपक्रमाला कुडाळ शहर शिवसेनेने दिलेल्या आयोजनाच्या साथीने ही स्पर्धा गेली दोन वर्षे सातत्याने आयोजित केली जात आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून एकूण १० स्पर्धक मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, गटनेते विलास कुडाळकर, महिला शहरप्रमुख तथा नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेवक राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, माजी सरपंच अरविंद शिरसाट, सुशील कदम, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे, राकेश नेमळेकर, प्रथमेश कांबळी, चेतन पडते, राजवीर पाटील, संदेश सावंत, राजाराम गडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी बोलताना सांगितले की, अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे आणि ती सातत्याने टिकवून ठेवणे सोपे काम नाही. मात्र, शहरप्रमुख अभिषेक गावडे व त्यांचे सहकारी गेली दोन वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. नरकासुराचे केवळ प्रतिकात्मक दहन करणे महत्त्वाचे नसून, समाजात आणि आपल्या जीवनात असलेल्या नरकासुररूपी वाईट प्रवृत्तींचा नाश करणे अधिक गरजेचे आहे. भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी नरकासुराच्या अहंकाराचा अंत केला. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मनातील अहंकार आणि वाईट प्रवृत्ती संपवून नव्याने जीवन जगण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले.
स्पर्धेचे परीक्षण राहुल मोंडकर आणि स्वप्निल तारी यांनी केले, तर निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले. आमदार निलेश राणे यांच्या पुरस्कृत पाठबळातून आणि कुडाळ शहर शिवसेनेच्या पुढाकारातून आयोजित या स्पर्धेने कुडाळच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उत्साहात भर घातली.





Subscribe to my channel




