सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले; वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

निर्मला नदीत आंघोळीसाठी उतरला अन् काळाने घातला घाला

कुडाळ : मित्रांसोबत आनंदाचे काही क्षण घालवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर काळाने अचानक झडप घातली. माणगाव खोऱ्यातील कालेली-धरणवाडी येथील निर्मला नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेल्या ३३ वर्षीय प्रतिराज उर्फ राजू भार्गव कुडपकर यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने वेंगुर्ले परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रतिराज कुडपकर (रा. वेंगुर्ले-कॅम्प, भटवाडी) हे शनिवारी आपल्या चुलतभावासह एका मित्रासोबत माणगाव येथे गेले होते. मित्राच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर तिघांनी कालेली-धरणवाडी येथील देवकोंड परिसरातील निर्मला नदीवर जाण्याचे ठरवले. नदीत आंघोळ करताना अचानक प्रतिराज यांचा पाय दगडावरून घसरला. तोल जाऊन ते दगडावर आदळले आणि नदीपात्रातील चिखलात अडकून पाण्यात बुडाले.

क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने सोबत असलेले चुलतभाऊ आणि मित्र हादरून गेले. प्रतिराज यांना वाचवण्यासाठी दोघांनीही जीवाचे रान केले. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. डोळ्यांदेखत घडलेल्या या दुर्दैवी घटनेत प्रतिराज यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस दूरक्षेत्रातील अधिकारी आणि कुडाळ पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह कुडाळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, मृताच्या चुलतभावाने फिर्याद दिली आहे.

सहा महिन्यांच्या लेकीचे छत्र हरपले!

प्रतिराज उर्फ राजू कुडपकर हे स्लायडिंगचा व्यवसाय करत होते. मित्रपरिवारात ते राजू या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली मुलगी, आई, भाऊ, भावजय आणि अन्य नातेवाईक असा परिवार आहे. ज्या वयात चिमुकलीला वडिलांच्या कुशीत खेळायचे होते, त्यांच्या प्रेमाचा सहवास अनुभवायचा होता, त्याच वयात नियतीने तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हिरावून घेतले. सहा महिन्यांच्या लेकीला वडिलांचे प्रेम अनुभवण्याची संधीही नियतीने दिली नाही. पत्नीच्या संसाराचा आधार हरपला, तर आईच्या म्हातारपणाची काठी काळाने हिरावून नेली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. कुडपकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने वेंगुर्ले परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!