
उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या घरात कारवाई; पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची माहिती
वेंगुर्ले : सिंधुदुर्गातील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असतानाच वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शिरोडा येथील घरात अंमली पदार्थ आढळल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे. सिद्धेश परब याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या घटनेमुळे सिंधुदुर्गातील राजकीय वर्तुळासह सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. संबंधित अमली पदार्थ घरात कसे आले, त्यामागे नेमका कोणाचा सहभाग आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती किती आहे, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ अभियानावर भर दिला आहे. अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि संबंधित अवैध व्यवहारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.
राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरातच अमली पदार्थ आढळल्याची माहिती समोर आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती, जप्त पदार्थाचे स्वरूप, प्रमाण तसेच संबंधितांची भूमिका तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसांकडून अवैध धंदे आणि अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. शिरोडा प्रकरणाच्या तपासातून पुढे कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे आता संपूर्ण सिंधुदुर्गाचे लक्ष लागले आहे.






Subscribe to my channel






