९ किलो सोन्याच्या प्रकरणात रिझर्व्ह बँकेची एन्ट्री; मुथूट फिनकॉर्पकडे खुलासा मागितला

मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणात आता भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष घातले असून, संबंधित कंपनीकडे खुलासा मागविण्यात आल्याची माहिती सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंचाच्या वतीने देण्यात आली आहे. या घडामोडीमुळे फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

मालवण शाखेतील सोनेतारण व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर मालवण पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक १५४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असून एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात सुमारे ९ किलो सोने अडकले आहे.

स्थानिक मच्छीमार महिला आणि अन्य ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंचाने मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत भाजप नगरसेवक रविकिरण तोरसकर यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्याशी संपर्क साधला होता. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देत हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली होती.

या निवेदनाची दखल घेत भागवत कराड यांनी रिझर्व्ह बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतली आणि पुढील तपासासाठी सहकार्य करण्याची सूचना केली. त्यानंतर मंचाच्या विधी सल्लागारांनीही रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा सुरू ठेवला. या पाठपुराव्याची दखल घेत रिझर्व्ह बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मंचाशी संपर्क साधला असून, मुथूट फिनकॉर्पकडे या प्रकरणासंदर्भात खुलासा मागविल्याचे मंचाने स्पष्ट केले आहे.

या प्रक्रियेमुळे फसवणूक झालेल्या मच्छीमार महिला आणि अन्य ग्राहकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. मात्र, अडकलेले सोने आणि ग्राहकांची आर्थिक नुकसानभरपाई प्रत्यक्षात कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पाठपुराव्यात विधी सल्लागार ॲड. श्रीराम चिंदरकर, ॲड. तारिका कुबल-चिंदरकर, ॲड. ऐश्वर्य मांजरेकर तसेच अन्य सहकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती मंचाच्या वतीने सौ. सिया रामचंद्र धुरी यांनी दिली आहे.

error: Content is protected !!