रेवतळे सागरी महामार्ग बनलाय “डम्पिंग ग्राउंड” ; खड्ड्यांमुळे रस्त्याचीही दुरवस्था
नगरपालिकेचे दुर्लक्ष, तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडणार : भाजपा युवा मोर्चाचा इशारा
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरातील रेवतळे सागरी महामार्ग येथे बिल्डिंग मटेरियलसह प्लास्टिक व इतर विविध प्रकारचा कचरा टाकला जात आहे. हा टाकलेला कचरा भटकी जनावरे, कुत्रे रस्त्यावर आणून अस्वच्छता करत आहेत. त्यामुळे हा परिसरच डम्पिंग ग्राउंड बनला आहे. मात्र याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. तसेच देऊळवाडा ते कोळंब सागरी महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून यांमुळे येथे सातत्याने लहान- मोठे अपघात होत आहेत. तरी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी दिला आहे.
युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी पाहणी करून येथील परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. यामध्ये शहराध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह निनाद बादेकर, राजा मांजरेकर, बाबू शिंदे, संकेत जाधव, शुभम लुडबे, अनिल मुणगेकर आदींचा समावेश होता. रेवतळे सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात आहे. भटके कुत्रे हाच कचरा आजूबाजूच्या परिसरात आणून दुर्गंधी करत आहेत. यामुळेच सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने आरोग्यास धोकादायक आहे. कचऱ्यामुळे तेथील पाणथळ भागातील कांदळवनाला देखील धोका निर्माण झाला आहे. मात्र याठिकाणी नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही लक्ष असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नगरपालिकेने याठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी व कचरागाडीची फेरी सुध्दा नियमित ठेवावी. या भागाची स्वच्छता करतानाच कचरा टाकण्यास निर्बंध करण्याबाबत नगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
देऊळवाडा कवटकर दुकान ते कोळंब हा सागरी महामार्ग खड्डेमय झाला आहे. पावसामुळे त्याची अवस्था अजून बिकट झाली आहे. याठिकाणी छोटे मोठे अपघात होत असून पादचारी व दुचाकीस्वारांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत. या मार्गावर भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास यासाठी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देखील युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच रेवतळे भागातील स्ट्रीट लाईट सुध्दा मागील एक आठवडा बंद आहेत. तक्रार करून सुद्धा प्रशासनाकडून कोणतीच हालचाल नाही. यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.