कॅडेट आराध्य नाटेकर याने साकारली प्रभू श्रीरामांची भूमिका; सत्य, शौर्य आणि सदाचाराचा संदेश
सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी येथे विजयादशमीचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमातून सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर होणाऱ्या विजयाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कॅडेट आराध्य नाटेकर याने साकारलेली प्रभू श्रीराम यांची भूमिका. प्रभू श्रीराम यांची वेशभूषा परिधान करून आराध्यने त्यांच्या शौर्य, शिस्त आणि सत्यनिष्ठेचे प्रतीकात्मक दर्शन घडविले. रावण दहनाच्या माध्यमातून अहंकार, अन्याय आणि दुष्ट प्रवृत्तींचा अखेरीस पराभव होतो आणि धर्माचा विजय होतो, हा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
सैनिकी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता, धैर्य, चारित्र्य आणि कर्तव्यनिष्ठा हे गुण रुजविण्यावर भोसले सैनिक स्कूलमध्ये भर दिला जातो. विजयादशमीच्या या सोहळ्याने या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभू श्रीराम यांच्या आदर्शांप्रमाणे सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून कॅडेट्सना मिळाली. रावण दहनाच्या माध्यमातून वाईट प्रवृत्तींचा त्याग करून चांगुलपणाचा स्वीकार करण्याचा संदेश देत शाळेत विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.