सावंतवाडीत भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची जनजागृती रॅली; घोषणांतून स्वच्छता, पर्यावरण अन् मर्यादित मोबाईल वापराचा संदेश

महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी | प्रतिनिधी : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सावंतवाडी शहरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘माणुसकी जपा’, ‘स्वच्छता राखा’ अशा घोषणांनी शहरातील प्रमुख बाजारपेठ दुमदुमून गेली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर जनजागृती करत गांधीजींच्या विचारांना कृतीची जोड दिली.

नारायण मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख बाजारपेठेतून मार्गक्रमण करत रॅली गांधी चौकात पोहोचली. याठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. तसेच डिजिटल युगात मोबाईलचा वापर जबाबदारीने आणि मर्यादित स्वरूपात करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले.

पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, माणुसकी आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी या विषयांवर विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकल्यांच्या पथनाट्याला आणि जनजागृतीपर घोषणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महापुरुषांची जयंती केवळ औपचारिकपणे साजरी न करता त्यांच्या विचारांचे दैनंदिन जीवनात आचरण व्हावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. रॅली पुन्हा नारायण मंदिर येथे परतल्यानंतर तिची सांगता झाली. या उपक्रमात शाळेच्या उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षिका उमा झारापकर, रसिका कंग्राळकर, महिमा चारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!