
आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पेंडूरमध्ये भव्य उद्योगाचा शुभारंभ; स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा
मालवण : समुद्राशी नाळ जोडलेल्या सिंधुदुर्गात मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनाला बळ देणाऱ्या ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’ या नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ मालवण तालुक्यातील पेंडूर खरारेवाडी येथे रोवण्यात आली. रवीराज नार्वेकर, पिंट्या नार्वेकर आणि भाऊ नार्वेकर कुटुंबीयांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या भव्य प्रकल्पाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उत्साहात झाला.
“धाडस दाखवून व्यवसायात उतरला आहात; तुमच्या उद्योगाला आमचे पूर्ण पाठबळ राहील. या व्यवसायाचा नावलौकिक केवळ सिंधुदुर्गात नव्हे, तर देशभर व्हावा,” अशा शब्दांत आमदार निलेश राणे यांनी नार्वेकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. या उद्योगातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असून, ग्रामीण भागातील उद्योगविश्वासाठी हा प्रकल्प प्रेरणादायी ठरणार आहे.
बोट बांधणीची गरज ओळखून स्थानिक उद्योजकाचे धाडसी पाऊल
सिंधुदुर्गातील मासेमारी आणि पर्यटन व्यवसायासाठी विविध प्रकारच्या बोटींची मोठी गरज आहे. ही गरज परराज्यातून पूर्ण करण्याऐवजी स्थानिक पातळीवरच दर्जेदार फायबर बोटी तयार करण्याचा अभिनव उपक्रम नार्वेकर कुटुंबीयांनी हाती घेतला आहे. ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’च्या माध्यमातून मासेमारी, पर्यटन तसेच विविध व्यावसायिक गरजांसाठी ग्राहकांच्या मागणीनुसार फायबर बोटी तयार केल्या जाणार आहेत. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांतून प्राप्त होणाऱ्या मागणीनुसारही बोटींची निर्मिती करून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
जिल्ह्यातील पहिले नेव्हल आर्किटेक्ट रवीराज नार्वेकर यांचा गौरव
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले नेव्हल आर्किटेक्ट रवीराज नार्वेकर यांचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
आमदार राणे यांनी बोट निर्मितीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. बोटींची निर्मिती, वापरले जाणारे साहित्य, तांत्रिक बाबी आणि ग्राहकांच्या गरजा याबाबत त्यांनी माहिती घेतली. बोट बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी केलेल्या सविस्तर भाष्यामुळे या क्षेत्रातील त्यांचा अभ्यासही यावेळी स्पष्टपणे दिसून आला.
“तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग उभारावेत”
आमदार निलेश राणे यांनी तरुणांना उद्योग-व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन करताना सांगितले की, “सिंधुदुर्गच्या विकासासोबतच अधिकाधिक रोजगार निर्माण करण्यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आपण आणि महायुती सरकार प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. भविष्यात आणखी मोठ्या संधी निर्माण होतील.”
“रवीराज नार्वेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उभारलेला हा प्रकल्प अनेक हातांना रोजगार देणारा ठरेल. तरुणांनी अशा व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजेत, धाडसाने उद्योगात उतरले पाहिजे. मेहनत, गुणवत्ता आणि सातत्य ठेवले तर यश निश्चित मिळते,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“आधुनिक तंत्रज्ञानाच्या बोटी तयार करण्याचा मानस”
आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक दर्जेदार आणि ग्राहकांच्या गरजेनुसार अत्याधुनिक फायबर बोटी तयार करण्याचा मानस नार्वेकर कुटुंबीयांनी व्यक्त केला. व्यवसायाचा विस्तार करून सिंधुदुर्गासह राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांत बोटी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.आमदार राणे यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना “मेहनत, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन व्यवसाय उभारण्याचा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा धाडसी उपक्रमांना आमचे पाठबळ कायम राहील,” असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जागा मालक महेश सावंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, विश्वास गावकर, दीपा सावंत, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, देवेंद्र नाईक, उपतालुकाप्रमुख अतीक शेख, विभाग प्रमुख राजन माणगावकर, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि नार्वेकर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पप्या नाईक, परमेश्वर मेस्त्री आणि बंड्या नांदोसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दत्ता सामंत आणि बाबा परब यांनीही उपक्रमाचे कौतुक करत नार्वेकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध निवेदक बादल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
स्थानिक गरज, स्थानिक कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारा ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’ हा प्रकल्प सिंधुदुर्गातील बोट निर्मिती उद्योगाला नवी दिशा देतानाच स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार देणारा महत्त्वपूर्ण उद्योग ठरण्याची अपेक्षा आहे.






Subscribe to my channel






