
कुडाळ : शहरातील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (पूर्वाश्रमीच्या सोनाली सुभाष सांगेलकर, वय ३६) हिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी तिचा नवरा सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी तिचा भाऊ भूषण सुभाष सांगेलकर (वय ३९, रा. सांगेली, ता. सावंतवाडी, सध्या रा. डोंबिवली पूर्व) याने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १५ वर्षांपूर्वी तन्वी हिचा सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर याच्याशी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत चालला. परंतु संशयित आरोपीचे एका अन्य महिलेशी संबंध असल्याचा संशय तन्वी हिने व्यक्त करून त्याबाबत विचारणा केल्यावर संशयित आरोपी तीचा मानसिक व शारीरिक छळ करू लागला. संशयित आरोपी पत्नीवर सतत संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करत असे. तसेच, माहेरच्या आई-वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यास मज्जाव करत त्याने भावाचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला होता.
१८ जून २०२६ पासून आरोपीच्या छळाचे आणि संशयाचे प्रमाण वाढल्याने तन्वी या तीव्र मानसिक तणावाखाली होती. या सततच्या त्रासाला कंटाळूनच तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करीत आहेत. दरम्यान, मृत तन्वी कुडाळकर हिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





Subscribe to my channel






