१६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; आठवड्यातील सातही दिवस मिळणार सेवा!
पालकमंत्री नितेश राणे यांचे ‘येवा, कोकण आपलोच आसा!’ म्हणत प्रवासी व पर्यटकांना आवाहन
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून, चिपी (सिंधुदुर्ग) ते नवी मुंबई विमानसेवेच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी या मार्गावरील Fly91 विमानाचे पहिले उड्डाण होणार आहे. विशेष म्हणजे, ही विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार असल्याने सिंधुदुर्गवासीयांसाठी प्रवासाचा नवा पर्याय खुला झाला आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या ‘X’ या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. ‘येवा, कोकण आपलोच आसा!’ असे आपुलकीचे आवाहन करत त्यांनी कोकणात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई यांच्यातील हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात कामानिमित्त जाणारे नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना या सेवेचा फायदा होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच कोकणच्या पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने देशाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करत असताना, नियमित विमानसेवेची उपलब्धता ही पर्यटनवाढीसाठी महत्त्वाची ठरू शकते. चिपी विमानतळावरून सातही दिवस विमानसेवा सुरू होण्याच्या या घडामोडीमुळे स्थानिक पर्यटन, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोकणच्या पर्यटनाला नवी भरारी देणाऱ्या या विमानसेवेमुळे आता सिंधुदुर्ग ते नवी मुंबई प्रवास अधिक जवळचा होणार आहे.





Subscribe to my channel




