सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेला मोहरम ताजिया मिरवणूक सोहळा मालवणात उत्साहात
मालवण : सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा मोहरम ताजिया (ताबूत) मंगळवारी मालवणात मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे साजरा करण्यात आला. अशी माहिती मेढा, मालवण येथील मोहरम मानकरी यांच्या वतीने देण्यात आली आहे.
किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण वासीयांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून मालवण येथील ‘मोहरम ताजियाकडे’ पाहिले जाते. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव म्हणून या सोहळ्याची ओळख आहे. पाच पवित्र आत्म्यांचे प्रतिक म्हजेच ताजिया (ताबूत) मानले जाते.
मंगळवारी दुपारी १ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम हिंदू बांधव एकत्र येत होडीच्या सहाय्याने ताजिया (ताबूत) समुद्रातून मालवण मेढा पिराची भाटी याठिकाणी आणले. मेढा येथील मोठा ताबूतही त्यावेळी सजवून होता. दोन्ही ताजिया (ताबूत) मोहरम मिरवणूक मेढा येथून मालवण बंदरजेटी, बाजारपेठ, भरड मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट मार्गे प्रती वर्षांप्रमाणे पारंपरिक वाद्यांसाह काढण्यात आली. तर मेढा राजकोट समुद्र किनारी या ताजीयाचे (ताबूत) रात्री विसर्जन करण्यात आले.