सिंधुदुर्गात मिनी साखर कारखाना उभारणार !
आमदार नितेश राणे यांची वैभववाडीत घोषणा
वैभववाडी : जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऊस शेतकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून आर्थिक सक्षम बनविणे ही आमची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लवकरच मिनी साखर कारखाना उभारणार असल्याची माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे बोलताना दिली आहे.
वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून स्वस्त दरात गृहपयोगी वस्तूंच्या विक्रीचे दालन सुरू झाले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्ष नेहा माईनकर व भाजपा पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. आमदार नितेश राणे म्हणाले, विशेषतः वैभववाडी व कणकवली या तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चालू वर्षी खड्डेमय रस्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली. भविष्यात शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मिनी साखर कारखाना उभारणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. राजेंद्र पाताडे यांनी मानले.