
पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची महत्त्वपूर्ण बैठक
पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्यावर भर
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी जलव्यवस्थापनाची दिशा निश्चित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पाणी फाउंडेशनचे प्रमुख सल्लागार व ग्रामीण सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्यासोबत खासदार नारायण राणे यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन गावपातळीवर उपलब्ध पाण्याचे नियोजन, पाणी अडविणे, जलस्रोतांचे संगोपन आणि पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रभावी जलसंधारण उपाययोजना राबविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. पाणी वाटप समित्यांना योग्य प्रशिक्षण देणे, जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देणे आणि स्थानिक पातळीवर पाणी व्यवस्थापनाची सक्षम यंत्रणा उभी करणे, याबाबतही चर्चा झाली.
डॉ. अविनाश पोळ यांनी ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दीर्घकाळ काम केले असून, दुष्काळग्रस्त भागात लोकसहभागातून जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबविण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील जलव्यवस्थापनासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाचा उपयोग करून घेण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आतापासूनच पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत जिरविण्याच्या कामांना गती देण्याची भूमिका खासदार नारायण राणे यांनी मांडली. प्रशासनानेही जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाच्या उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका स्पष्ट केली. लोकसहभाग, प्रशासन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समन्वय साधून सिंधुदुर्गचा भविष्यातील पाणीप्रश्न अधिक सक्षमपणे हाताळण्यासाठी या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.







Subscribe to my channel






