निलेश राणेंच्या वाढदिनी कुडाळात रोजगार मेळावा

१७ मार्च रोजी आयोजन : निलेश राणेंची पत्रकार परिषदेत माहिती

कुडाळ : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी १७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्या. ५ वा. पर्यंत कुडाळ येथील नवीन एसटी बस आगार येथील मैदानावर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. श्री. राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत स्वतः याबाबत माहिती दिली.

कुडाळ येथील भाजप कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शहर अध्यक्ष राकेश कांदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोरोना काळामध्ये अनेक जण बेरोजगार झाले. या बेरोजगार झालेल्या तरुणांच्या हाताला पुन्हा एकदा काम मिळावे या हेतूने कुडाळ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये येणाऱ्या कंपन्यांना नुसत्या ऑफर लेटर देऊन चालणार नाही, तर येणाऱ्या रोजगाराला पक्की नोकरी ही दिलीच पाहिजे हा आमचा त्यांच्याजवळ मानस असणार आहे. तसेच ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांच्यासाठी जॉब कार्ड दिला जाईल. त्या माध्यमातून वर्षभर रिक्त झालेल्या जागांवर त्यांना नोकरी शोधणे सोपे होणार आहे. या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी संधी घ्यावी आणि नोकरी मिळवावी असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. इतर पक्ष अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतील असं वाटत नाही, मात्र भारतीय जनता पक्ष बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे त्यांनी सांगितले
.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!