पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट; ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना

आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी, बारा बलुतेदारांसह शेतकरी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्तांसाठी एकत्रित व्यासपीठ

ठाणे | प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांना आता एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे. आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी आणि बारा बलुतेदार समाजासह शेतकरी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्त, युवक आणि महिलांच्या प्रश्नांसाठी ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना करण्यात येणार आहे. या महासंघाचा स्थापना सोहळा २९ सप्टेंबर रोजी ठाणे पश्चिम येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.

एमएमआर परिसरात झपाट्याने होणारे शहरीकरण आणि विविध पायाभूत प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या जमिनी, गावठाणे, कोळीवाडे, घरे, पारंपरिक व्यवसाय, रोजगार आणि पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांवर सामूहिकपणे आवाज उठविण्यासाठी महासंघाची स्थापना होत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

गावठाणे, कोळीवाड्यांच्या प्रश्नांना प्राधान्य

शहरीकरणाच्या प्रक्रियेत पारंपरिक गावठाणे आणि कोळीवाड्यांमधील नागरिकांना घरांची पुनर्बांधणी, परवानग्या तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. जुन्या व मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी सुलभ धोरण आखणे आणि शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे.

प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि मच्छिमारांच्या प्रश्नांसाठी सामूहिक भूमिका

सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी, जेएनपीए, बुलेट ट्रेन, वसई-विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोस्टल रोड आणि वाढवण बंदर यांसारख्या विविध प्रकल्पांच्या संदर्भातील स्थानिक प्रश्न महासंघाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. प्रकल्पांमुळे प्रभावित होणाऱ्या शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, पुनर्वसन, रोजगार आणि स्थानिक सहभाग मिळावा, यासाठी सामूहिक भूमिका घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सागरी पर्यावरणाचे संरक्षण, खाड्या व जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे आणि पारंपरिक मच्छिमारी तसेच मच्छिमारांची उपजीविका सुरक्षित ठेवणे, या मुद्द्यांवरही महासंघ काम करणार आहे.

स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेवर भर

एमएमआर परिसरात निर्माण होणाऱ्या उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी कौशल्यविकास, शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची भूमिका महासंघ मांडणार आहे. स्थानिक नागरिकांच्या वीज वितरण, वाढीव वीजबिले आणि ग्राहक तक्रारी यांसारख्या प्रश्नांवरही संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा मुद्दा अजेंड्यावर

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर निर्णय व्हावा, अशी भूमिपुत्रांची भूमिका महासंघाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. सागरी भूमिपुत्रांचे विविध प्रश्न एका व्यासपीठावर आणण्यासाठी खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या पुढाकारातून या महासंघाची स्थापना होत आहे. विविध समाजांच्या संस्था व संघटनांना एकत्र आणून लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा महासंघाचा मानस आहे.

स्थापना सोहळ्यास बालयोगी सदानंद महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच पद्मविभूषण शरदचंद्र पवार आणि पद्मश्री लक्ष्मण माने यांचीही विशेष उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. सागरी भूमिपुत्रांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाबद्दल पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना ‘विशेष सागरी रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच पाचही सागरी जिल्ह्यांतील आजी-माजी भूमिपुत्र आमदार तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी स्थापना सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पाच सागरी जिल्हे – एक भूमिपुत्र समाज – एक व्यासपीठ – एकजूट’ या भूमिकेतून विविध समाज, संस्था, संघटना, शेतकरी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्त, युवक आणि महिलांनी महासंघात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!