सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सावंतवाडी शहरातील धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली. भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते धिरेंद्र म्हापसेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत ओबीसी समाजातील विविध घटकांना संघटित करण्यासोबतच भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
म्हापसेकर यांच्या नियुक्तीबद्दल भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी शहरातील ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.