
सिंधुदुर्ग : पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी आता केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर भर देत सिंधुदुर्गात लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी सुरू आहे. याच उपक्रमाला बळ देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी पाट येथे विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष श्रमदान केले. सिंधुदुर्गात लोकसहभागातून सुरू असलेली ही जलसंधारणाची चळवळ राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत पाट येथील एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेला भेट दिल्यानंतर मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर वनराई बंधारा उभारणीच्या ठिकाणी जात त्यांनी स्वतः श्रमदान करत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. या श्रमदानात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले.

जलसंधारण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही; लोकसहभागातून ती जनचळवळ बनली पाहिजे, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाच्या कामाला गती दिल्यास त्याचे दूरगामी परिणाम दिसतील, असे त्यांनी सांगितले. वनराई बंधारे उभारणे म्हणजे केवळ पाणी अडविणे नव्हे, तर जलसाक्षरता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सहभागाची नवी पिढी घडविणे आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून घेतलेला संदेश घराघरात आणि गावागावात पोहोचवावा, असे आवाहन भुसे यांनी केले.
यावेळी त्यांनी बंधाऱ्यालगतच्या भातशेतीचीही पाहणी केली. सिंधुदुर्गच्या लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या जलसंधारणाच्या या प्रयोगाची राज्यभर दखल घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त करत मंत्री भुसे यांनी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली.







Subscribe to my channel






