
‘संग्राम काजू फॅक्टरी’च्या माध्यमातून अल्पावधीत उभारला ब्रँड; मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मुंबईत सन्मान
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील महान गावचे युवा उद्योजक संग्राम साळसकर यांनी कमी वयात ‘संग्राम काजू फॅक्टरी’ हा स्वतःचा ब्रँड उभा करून उद्योजकतेच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र आयडॉल युवा उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर येथे झालेल्या ‘ग्लोबल महाराष्ट्र उद्योग परिषद’ आणि ‘महाराष्ट्र उद्योगरत्न सन्मान सोहळ्या’त महाराष्ट्राचे फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संग्राम साळसकर यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रातील उद्योग, उद्योजकता, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातून सुमारे ५०० उद्योजक, युवा उद्योजक व मान्यवर या परिषदेला उपस्थित होते.
‘संग्राम काजू फॅक्टरी’ची यशस्वी वाटचाल
कोकणातील काजू उद्योगाला आधुनिक ब्रँडिंगची जोड देण्याच्या उद्देशाने संग्राम साळसकर यांनी ‘संग्राम काजू फॅक्टरी’ हा ब्रँड विकसित केला. अल्पावधीत ग्राहकांमध्ये स्वतःच्या ब्रँडची ओळख निर्माण करण्याबरोबरच काजू व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातून उद्योगाची सुरुवात करून स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याची त्यांची वाटचाल मालवण तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नोकरीच्या शोधात राहण्याऐवजी स्वतः उद्योग उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा संदेश त्यांच्या उद्योजकीय प्रवासातून मिळतो.

संजय यादवराव यांच्या संकल्पनेतून आयोजन
शिवस्वराज्य मराठी लोक चळवळीचे संस्थापक संजय यादवराव यांच्या संकल्पनेतून तसेच समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ मिळवून देणे, युवा पिढीला उद्योग क्षेत्राकडे आकर्षित करणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे हा परिषदेचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध असलेले दत्तात्रय वारे गुरुजी, सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अजित मराठे आणि हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा गौरव
या सोहळ्यात समाज, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र आयडॉल समाजरत्न’, तर उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘महाराष्ट्र आयडॉल उद्योगभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये दत्तात्रय वारे गुरुजी, रजनीश राणे, प्राची बालकर, निरंजन आहेर, गायत्री लाड, गणेश लाड, अजय यादव आणि निलेश मोरे यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तर उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी गणेश निबे, देवेंद्र परुळेकर, तेजस परुळेकर, नितीन कोंढाळकर आणि गजाननजी जाधव यांच्यासह अन्य उद्योजकांचा उद्योगभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

युवा उद्योजकांच्या श्रेणीत निशांत पाटील, ग्रीमा राजीव पाटील, प्रसाद मालपेकर, नील सावे, अक्षय लाड, संग्राम साळसकर, मंगेश चोरेडेकर, तुषार माने, अमेय करणे, राजेश धयाळकर आणि योगेश निवळकर यांना ‘युवा उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. दीपक परब – उपाध्यक्ष, समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, राजश्री यादवराव, राम कोळवणकर, नरेंद्र बामणे, अजित मराठे – अध्यक्ष, सॅटर्डे क्लब, किशोर धारिया – अध्यक्ष, हिरवळ प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य मिळाले. “उद्योग करा, रोजगार निर्माण करा, महाराष्ट्र समृद्ध करा” या विचारातून मराठी उद्योजकतेला बळ देणाऱ्या या परिषदेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील उद्योजकतेच्या नव्या पर्वाची नांदी ठरला.







Subscribe to my channel






