पर्यटकांना घेऊन जाणारी बस अंगणात घुसली ; तीन प्रवासी जखमी

धामापूर येथील दुर्घटना ; सात जणांना किरकोळ दुखापत

विद्युत पोललाही धडक ; वीजेचा पोल मुळासकट उखडला

मालवण : भरधाव वेगाने मालवण येथून गोव्याच्या दिशेने पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस रस्त्याच्या शेजारील घराच्या अंगणात १० फूट खाली कोसळल्याची दुर्घटना धामापूर घाडीवाडी येथे निसर्ग हॉटेलच्या समोर घडली आहे. या दुर्घटनेत तीन प्रवाशांना गंभीर तर सात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातातील जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी कुडाळ येथे रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी गोवा येथून पर्यटकांना मालवण येथे स्कुबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी घेऊन गेलेली टेम्पो ट्रॅव्हलर बस पर्यटकांना सायंकाळी गोव्याच्या दिशेने घेऊन जात होती. दुपारी ३.३० वाजता धामापूर येथे ही बस आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने २५ प्रवाशांनी भरलेली बस दत्ताराम घाडी यांच्या अंगणात रस्त्यावरून सुमारे १० फूट कोसळली. यामध्ये मोरेश्वर आजगावकर यांच्या कुंपण आणि पायऱ्यांचेही नुकसान झाले आहे. बसची धडक एवढी गंभीर होती की यामध्ये रस्ताकडेला असलेला एक विद्युत पोल ट्रॅव्हलर च्या धडकेने मुळापासून पूर्णपणे तुटून ४० फूट लांब गाडीसहीत फरपटत गेला आहे. तर दुसरा ११ केव्ही लाईन पोल वाकून विद्युत पुरवठा खंडीत झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरचेही मोठे नुकसान झाले. यावेळी वीज वितरण कर्मचारी योगेश काळसेकर आणि सागर गावठे यांनी तातडीने घटनास्थळी येत काही घरांचा वगळता इतर गावातील वीजपुरवठा पूर्ववत केला.

आता तरी गतिरोधक घाला ; स्थानिकांची मागणी

या अपघातानंतर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी याठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. धामापूर ते नेरूरपार दरम्यानच्या रस्त्यावर वारंवार अपघात होतात. दररोज या रस्त्यावरुन पर्यटकांना घेऊन जाणारी अनेक वाहने भरधाव वेगात ये जा करत असतात. तसेच वाळू वाहतूक करणारे डंपरही मोठ्या वेगात ये जा करत असतात. म्हणून त्यांच्या वेगाला आवर घालण्यासाठी बांधकाम विभागाने धामापूर तलाव ते नेरुरपार पुलादरम्यान चार ठिकाणी गतिरोधक घालावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!