समुद्राच्या लाटांनी हिरावले दोन जीव; कुटुंबीयांच्या दुःखात आमदार निलेश राणे सहभागी

मालवण : मालवण समुद्रात मासेमारी नौका बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कै. सन्मेष सुरेश परब आणि कै. अक्षय हनुमंत राणे यांच्या कुटुंबीयांची आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत त्यांनी त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगितले.

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठिमागील खडकाळ समुद्र परिसरात मंगळवारी मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’ नौका समुद्रातील मोठ्या लाटांच्या तडाख्यात सापडून बुडाली. या दुर्घटनेत दांडी येथील मच्छिमार तथा भाजपा मालवण उपाध्यक्ष आणि नौका मालक सन्मेष सुरेश परब तसेच खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने दांडीसह संपूर्ण मालवण परिसरावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी दोन्ही कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अचानक ओढवलेल्या या दुःखद प्रसंगामुळे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखाची त्यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेशा आचरेकर, बाबा परब, नगरसेवक महेश कोयंडे, महेश कांदळगावकर, ललित चव्हाण, महानंदा खानोलकर, महिमा मयेकर, मोहन वराडकर, सिद्धार्थ जाधव यांच्यासह शिवसेना व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!