श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

दुपारी १२ वाजता संपन्न होणार जन्म सोहळा, पाळणा आणि आरती

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार १४८ व्या श्री स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेचे पुजन

अक्कलकोट : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन शुक्रवार दि. २० मार्च रोजी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये विविध पारंपारीक धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.

प्रारंभी प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गुढीपाडव्यानिमीत्त हिंदू संस्कृतीच्या नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या पादूकांस पहाटेच्या काकडआरती नंतर अभिषेक करण्यात येईल. सकाळी १०:३० वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रींच्या चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन व भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पुजन होईल. सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते अर्पण करण्यात येईल. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरीता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शीरा प्रसाद वाटप करण्यात येईल.

सालाबादप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मुळस्थान) अक्कलकोटच्या वतीने वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन शुक्रवार दि. २० मार्च रोजी साजरा होत आहे. यादिवशी पहाटे ४ वाजता श्रींची काकड आरती संपन्न होईल. यानंतर श्री स्वामी प्रकट दिन ते श्री स्वामी पुण्यतिथी अखेर पारंपारीक पद्धतीने पहाटे पारंपारीक नगर प्रदक्षिणेस (प्रभात फेरी) प्रारंभ होईल. गुढी पाडवा, प्रकटदिन साप्ताहीक सुट्टया इत्यादीमुळं मंदीरात स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे श्री स्वामी समर्थांचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणेसाठी १९ ते २२ मार्च अखेर स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. जे स्वामीभक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल.

श्री स्वामी प्रकट दिन रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहिले जाईल. त्यानंतर पाळणा, भजनगीत व आरती होईल. दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे.

श्री स्वामींच्या या प्रकट दिनानिमीत्त वटवृक्ष मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. दि. १९ ते २२ मार्च अखेर भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदीर समितीच्या वतीने मंदीर व परिसरात महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग, दर्शन रांगेत कापडी मंडप, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, अग्नीशमन यंत्रणा, मंदीरात कुलर व फॅनची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्था इत्यादीचे नियोजन करण्यात आले आहे, तरी सर्व स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन, पाळणा कार्यक्रम, भोजन महाप्रसाद, भजन इत्यादी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!

Subscribe