ठाकरे शिवसेना आक्रमक ; संतप्त पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर ; जीवरक्षकांना साहित्य सुपूर्द


मालवण : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेली स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे, तर किनारपट्टीवर नियुक्त करण्यात आलेल्या जीवरक्षकांना देखील आवश्यक असलेले सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले नसल्याबद्दल संतप्त झालेल्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालिकेत धडक देत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दोन दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोबोटीक वॉटर क्राफ्ट पालिकेत पडून असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किनारपट्टी भागात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने ही आधुनिक सुविधा तातडीने किनाऱ्यावर उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यातच दोन दिवसांपूर्वी चिवला बीच समोरील समुद्रात चार स्थानिक मुली बुडत असल्याचे पर्यटकांना दिसले. पर्यटकांनी तत्काळ स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना माहिती दिल्यावर त्यांनी या चारही मुलींना वाचविले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे पालिकेचा पर्यटकांच्या सुरक्षेबाबत असलेला अक्षम्य दुर्लक्षपणा आणि उदासीनता स्पष्टपणे दिसून आली.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिकेत धडक देत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेली स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट पर्यटन हंगामात किनाऱ्यावर का उपलब्ध ठेवली नाही? जर त्या मुली बुडाल्या असत्या तर मालवणची मोठी बदनामी झाली असती, याला जबाबदार कोण? हे रोबोटीक वॉटर क्राफ्ट केव्हा किनारपट्टीवर उपलब्ध करून देणार? पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. यावर प्रशासनाने चिवला तसेच बंदर जेटी ते दांडी या भागासाठी दोन जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.
जीवरक्षकांच्या नियुक्तीवर समाधान न मानता पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला. यात या जीवरक्षकांना त्यांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट, पर्यटकांना वाचविण्यासाठी आवश्यक रिंग बोया, दोरी, कपडे, ओळखपत्र दिले आहे का? तसेच या जीवरक्षकांचा विमा उतरविण्यात आला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. याबाबतची कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाने केली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने पदाधिकारी अधिकच संतप्त झाले.संतप्त पदाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची तात्काळ पूर्तता करावी तसेच किनारपट्टी भागात आणखी दोन जीवरक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. यानुसार पालिकेच्या अधिकारी संध्या गवळी यांनी याची कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरताच पालिका प्रशासनाने तातडीने संबंधित जीवरक्षकांना आवश्यक साहित्य तसेच स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट सुपूर्द केले. यावेळी नितीन वाळके यांनी प्रशासनाला दुर्घटना घडण्याची वाट न पाहता आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील इतर समस्यांकडेही पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. यात दुरवस्था झालेले अंतर्गत रस्ते, गवंडीवाडा येथील शौचालय, पथदिवे आणि बंद असलेल्या नळपाणी योजनेचे काम यांचा समावेश होता. या सर्व बाबींवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, अन्वय प्रभू, गौरव वेर्लेकर, हेमंत मोंडकर, उमेश चव्हाण, तपस्वी मयेकर, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, रवी मिटकर, सिद्धेश मांजरेकर, अक्षय भोसले, दीपा शिंदे, विद्या फर्नांडिस तसेच पालिकेच्या अधिकारी संध्या गवळी आणि श्री. पवार उपस्थित होते.

Subscribe to my channel




