मालवणच्या पाणीटंचाई नियोजन बैठका आ. निलेश राणेंच्या अनुपस्थितीमुळे रद्द

सलग दोन दिवस नियोजित बैठका रद्द; आमदारांना वेळ नसेल तर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक घ्या – वैभव नाईकांचा टोला

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठका आमदार निलेश राणे यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द झाल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आमदारांना सिंधुदुर्गात येणे शक्य नसल्यास बैठक त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी घ्यावी, असा टोला नाईक यांनी तहसीलदार यांना लगावला आहे.

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झाल्याने आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन, नवीन जलस्रोतांची निर्मिती आणि आवश्यक निधीची तरतूद याबाबत चर्चा करण्यासाठी मालवण तहसीलदारांनी ८ ऑक्टोबरला बैठक आयोजित केली होती. मात्र, आमदारांना उपस्थित राहता येणार नसल्याचे ऐनवेळी कळविण्यात आल्याने बैठक रद्द करून ९ ऑक्टोबरला पुन्हा आयोजित करण्यात आली.९ ऑक्टोबर रोजीही सकाळी ९ वाजता आमदार उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविण्यात आल्याने बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे संबंधित अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांना दोन वेळा बैठकीसाठी उपस्थित राहूनही परतावे लागल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

पाणीटंचाईचे नियोजन वेळेत करण्याची मागणी

मालवणमध्ये संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी वेळेत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. नवीन जलस्रोत निर्माण करून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. नियोजनात विलंब झाल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

error: Content is protected !!