
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचा सिंधुदुर्गातील सहा शाळांमध्ये झंझावाती दौरा; विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी थेट संवाद
सिंधुदुर्ग : केवळ गुणांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेण्याऐवजी त्यांच्यात शिस्त, संस्कार, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना रुजवा, असा स्पष्ट संदेश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सिंधुदुर्गातील शिक्षण व्यवस्थेला दिला. ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सहा शाळांना भेटी देत त्यांनी विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनापर्यंत थेट संवाद साधला.
या दौऱ्यात शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे कौशल्य, भौतिक सुविधा आणि विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, विभागीय उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद होणार नाही!’
कुडाळ हायस्कूलच्या भेटीत मंत्री भुसे यांनी शाळांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. पटसंख्या कमी आहे म्हणून शाळा बंद होणार नाहीत, तर त्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘राणी लक्ष्मीबाई सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण’ उपक्रमाचे कौतुक करत शिक्षणासोबत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणही आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एनसीसीची शिस्त प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा!
बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन, कुडाळ येथे एनसीसी विद्यार्थ्यांनी संचलनातून मंत्री भुसे यांना सलामी दिली. एनसीसीमुळे शिस्त, नेतृत्व आणि जबाबदारीची भावना विकसित होते. ही शिस्त केवळ एनसीसीपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाचा भाग बनली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
पालकांना कानमंत्र : मोबाईल कमी, मुलांशी संवाद जास्त
पाट येथील पालक मेळाव्यात मंत्री भुसे यांनी पालकांना थेट आवाहन केले. मोबाईलमध्ये गुंतण्यापेक्षा मुलांशी बोला, त्यांची आवड ओळखा आणि त्यांना योग्य क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन द्या, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. शाळांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या विकासासाठी योगदान देऊन शाळेचे ऋण फेडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दुष्काळावर विद्यार्थ्यांचे पथनाट्य; पाणी वाचविण्याचा थेट संदेश!
पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी ‘आभाळ कोकलंय’ या पथनाट्यातून दुष्काळाचे वास्तव मांडले. पाणी बचत, जलसंधारण, नदी संवर्धन, वृक्षारोपण आणि बंधाऱ्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. पथनाट्याचे कौतुक करत मंत्री भुसे यांनी ‘एक पेड माँ के नाम’ अभियानात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, तसेच हवा, पाणी आणि जमीन यांचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीवर शासनाकडून नियोजनबद्ध उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘देश प्रथम’ची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवा!
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत चांगले संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत. घरातील ज्येष्ठांचा आदर, अन्नदात्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदराची भावना विद्यार्थ्यांनी मनात रुजवावी. ‘देश प्रथम’ ही भावना घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवा आणि देशासाठी जबाबदार नागरिक बना, असा संदेश मंत्री भुसे यांनी दिला.
पडतेवाडी प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तर पावशीच्या जिल्हा परिषद शाळेत मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांचे वाचन ऐकून घेतले, गीत सादर करून घेतले आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मंत्री भुसे यांच्या भेटीमुळे शिक्षण विभागात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी शैक्षणिक गुणवत्तेत पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्गला पहिल्या क्रमांकावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.







Subscribe to my channel






