मालवणमध्ये अवैध वाळू वाहतुकीला महसूल विभागाचा दणका!

कुंभारमाठ येथे रात्रीच्या कारवाईत दोन डंपर पकडले; तहसीलदार गणेश लव्हे यांच्या आदेशानुसार संयुक्त पथकाची धडक कारवाई

मालवण : तालुक्यात अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने रात्रीच्या वेळी कुंभारमाठ येथे धडक कारवाई करत अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन डंपर ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण तालुक्यात रात्रीच्या वेळी अनधिकृत वाळू वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश लव्हे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे, एस. आर. गणगे, एन. डी. वरुडे आणि पी. एच. आतकरे यांच्या संयुक्त पथकाने कुंभारमाठ येथे रात्रीच्या वेळी तपासणी मोहीम राबवली.

या तपासणीदरम्यान अनधिकृत वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आलेले दोन डंपर पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये MH43 BG 7312 आणि GA 09 U 6123 या क्रमांकांच्या डंपरचा समावेश आहे. कारवाईनंतर दोन्ही डंपर मालवण तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाची नजर

वाळूचे अनधिकृत उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच पर्यावरणावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई केली जात आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तहसीलदार गणेश लव्हे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आगामी काळातही महसूल विभागाकडून अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार का, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!