संशयित शिक्षकाला अटक; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी
वैभववाडी : तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच वडिलांनी अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित शिक्षकाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शिक्षक मूळचा वैभववाडी तालुक्याबाहेरील रहिवासी असून सध्या तालुका मुख्यालयाजवळील एका गावात वास्तव्यास आहे. त्याचे यापूर्वी दोन विवाह झाले होते. त्यानंतर २०२० मध्ये त्याने तिसरा विवाह केला. या दाम्पत्याला साडेचार वर्षांची मुलगी आहे.पती-पत्नीमध्ये वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याने पत्नी काही काळ माहेरी राहत होती. जून २०२६ मध्ये ती पुन्हा पतीकडे राहण्यासाठी आली होती. मात्र, त्यानंतरही दोघांमधील वाद सुरूच होते.
शुक्रवारी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर पत्नी काही वेळासाठी घराबाहेर गेली असता, याच काळात संशयिताने चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप पत्नीने तक्रारीत केला आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी सायंकाळी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा संशयिताला ताब्यात घेत अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.





Subscribe to my channel




