

तोंडवळी ग्रामसभेचा वाळू उपशाविरोधात एल्गार
मालवण : कालावल खाडीपात्रातील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या क्षेत्रात होणाऱ्या अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपशाला तोंडवळी ग्रामस्थांनी संघटितपणे कडाडून विरोध दर्शवला आहे. आज दुपारी तोंडवळी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित विशेष ग्रामसभेत वाळू उपशाविरोधात एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांच्या या तीव्र भावनांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
सरपंच स्नेहा तोंडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत ग्रामस्थांनी वाळू उपशामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली. नायब तहसीलदार विनायक जांभेकर हे या सभेसाठी विशेष निरीक्षक म्हणून उपस्थित होते. सभेदरम्यान उपस्थित महिला व पुरुष ग्रामस्थांनी हात उंचावून वाळू उपशाला आपला तीव्र विरोध दर्शवला. यावेळी महसूल विभागाच्या देखरेखीखाली हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेला संबोधित करताना नायब तहसीलदार विनायक जांभेकर म्हणाले की, ग्रामस्थांच्या भावना आणि त्यांनी घेतलेला वाळू उपसा विरोधी ठराव आम्ही नोंदवून घेतला आहे. हा संपूर्ण अहवाल तातडीने जिल्हाधिकारी यांना सादर केला जाईल. अनधिकृत वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने विशेष पथके नेमली असून यात चार तलाठी आणि एका मंडळ अधिकाऱ्याचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीत अवैध वाहतूक खपवून घेतली जाणार नाही.
या विशेष ग्रामसभेला माजी सरपंच आबा कांदळकर, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत अधिकारी युती चव्हाण यांच्यासह सदस्य नरेंद्र मेस्त, स्नेहल केळुसकर, स्नेहल पाटील, अनन्या पाटील, मानसी चव्हाण, सुजाता पाटील, ज्ञानेश गोलतकर, भुपाल मालंडकर, जयहरी कोचरेकर, संजय केळुसकर, संजय तारी, ताता टिकम, मंडळ अधिकारी उमेश सिगनाथ, तलाठी प्रकाश गायकवाड आणि पोलीस पाटील मुळे उपस्थित होते.



Subscribe to my channel




