५०० कोटींच्या आरोपावरून आ. निलेश राणेंचा मनोज जरांगेंवर घणाघात

“कोणाकडून तरी ऐकलं म्हणजे पुरावा झाला का? माणुसकी आणि लाज तरी बाळगा!”

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून सुरू झालेल्या वादात आता आमदार निलेश राणे यांनी उडी घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कोणाकडून तरी ऐकलेल्या माहितीच्या आधारे इतका गंभीर आरोप केला जात असेल, तर त्याला पुरावा कसा मानायचा, असा थेट सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी कोकणात दररोज वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने पैशांच्या देवाणघेवाणीच्या चर्चा होत असल्याचे सांगत, अशा ऐकीव चर्चांना किती गांभीर्य द्यायचे, असा प्रश्नही उपस्थित केला.

“कोणीतरी बोलणार, एकाकडून घेऊन दुसऱ्याला ५०० कोटी दिले म्हणजे पुरावा झाला का?” अशा शब्दांत निलेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निलेश राणे यांनी आपल्या टीकेत कोकणातील परिस्थितीचा दाखला दिला. कोकणातील कोणत्या ना कोणत्या टीट्यावर, चौकात किंवा सार्वजनिक ठिकाणी दररोज कोणीतरी पैसे घेतले, कोणीतरी पैसे दिले, अशा चर्चा सुरू असतात. मात्र, या चर्चांचा ना बोलणाऱ्याला फारसा फरक पडतो, ना ऐकणाऱ्याला; कारण अनेकदा अशा गोष्टी कोणाकडून तरी ऐकलेल्या असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऐकीव माहिती आणि ठोस पुरावा यामध्ये मोठा फरक असतो. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत काही सांगितले, म्हणून तो दावा सत्य ठरत नाही. विशेषतः शेकडो कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासारख्या गंभीर विषयात आरोप करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे आवश्यक असल्याची भूमिका निलेश राणे यांनी मांडली आहे.

जरांगेंना थेट सुनावले; “माणुसकी आणि लाज तरी बाळगा!”

या प्रकरणावर टीका करताना निलेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत कठोर शब्दांचा वापर केला. “जरांगे पाटील, जरातरी माणुसकी आणि लाज स्वतःमध्ये जिवंत असायला पाहिजे होती,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

error: Content is protected !!