पालकमंत्र्यांच्या अनधिकृत धंद्यांवरील कारवाईच्या भूमिकेनंतर मालवणात महसूल विभाग आक्रमक

देवली मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या ४ डंपरवर फौजदारी कारवाई ; देवलीतील अनधिकृत वाळू उत्खननाचा पर्दाफाश 

कर्ली व कालावल खाडीमध्ये वाळू काढणाऱ्या अनधिकृत बोटींवर मेरिटाईम विभाग कारवाई करणार का ?

मालवण | कुणाल मांजरेकर

माझ्या जिल्ह्यात मटका, जुगार, चरस गांजा, अनधिकृत वाळू उत्खनन यांसारखे धंदे खपवून घेणार नसल्याचा इशारा देतानाच पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः कणकवलीतील मटका बुकीवर रेड मारल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मालवण मध्ये कालावल आणि कर्ली खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू काढली जात असल्याने तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या पथकाने शुक्रवारी रात्री गस्ती दरम्यान देवली बोवलेकर जेटी खारबांध मार्गावर चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केली. त्यामुळे देवलीत सुरु असणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खननाचा पर्दाफाश झाला आहे. कर्ली खाडीतून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपर चालकांवर मंडळ अधिकारी पिटर लोबो यांनी फौजदारी तक्रार दिली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत सुमारे २ कोटी २० हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

काल सायंकाळी निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, संजय गांधी नायब तहसीलदार प्रिया हर्णे, मंडळ अधिकारी पीटर लोबो, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र तारी आणि भरत शिंगनाथ यांचे पथक देवली बोवलेकरवाडी जेटी खारबांध मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना चार डंपर क्रमांक जीए ०४ टी १८६७, जीए ०९ यू ४७०७, जीए ०५ टी ६१३० आणि जीए ०४ टी २२७८ संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र ते न थांबता पुढे निघून गेले. सुमारे १०० मीटर अंतर पुढे गेल्यावर ते थांबले. यातील दोन डंपर क्रमांक जीए ०४ टी १८६७ आणि जीए ०९ यू ४७०७ चालकांनी डंपरमधील वाळू रस्त्यावर ओतून टाकली.

या प्रकरणी प्रथमेश बाळकृष्ण गावडे (वय २५), रा. माड्याचीवाडी ता. कुडाळ, गौरव अरुण नाईक (वय ३०), रा. रांगणा तुळसुली ता. कुडाळ शेखर संतोष राठोड (वय ४२), रा. गुढीपूर पिंगुळी ता. कुडाळ आणि शंकर सुरेश भितये (वय ३०) रा. गोठोस ता. कुडाळ या चार डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चालक शासनाची कोणतीही परवानगी नसताना वाळूची चोरी करून ती घेऊन जात असताना पकडले गेले. या चारही डंपरची किंमत सुमारे २ कोटी २० हजार रुपये असून ते जप्त करण्यात आले आहेत. 

दरम्यान, देवली खाडीपात्रात मोठया प्रमाणात चोरटी वाळू काढली जात असल्याचे या कारवाई निमित्ताने स्पष्ट झाले आहे. कर्ली व कालावल खाडीमध्ये चोरटे वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु असून वाळू काढणाऱ्या अनधिकृत बोटींवर मेरिटाईम विभाग कारवाई करणार का ? असा प्रश्न पडला आहे. महसूल विभागाने देखील या कारवाई बाबत मेरिटाईम बोर्डाला आदेश दिले असून देखील अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे मेरिटाईम विभागाचे अधिकारी संशयाच्या गर्तेत सापडले आहेत.

error: Content is protected !!