दत्ता सामंत यांची स्पष्टोक्ती: सुकळवाड पं. स. मध्ये आमचा पाठींबा महायुतीचे उमेदवार संतोष गावडे यांनाच…


मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा महायुतीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवण्यात येत आहेत. पक्षीय धोरणानुसार जागावाटप झालेल्या ठिकाणी भाजपाच्या वाट्याला आलेल्या जागांवर शिवसेनेचा भाजप उमेदवारांना पाठिंबा राहणार असून ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बंडखोर उमेदवाराला आमचा पाठिंबा राहणार नाही. झाराप मध्ये शिवसेनेच्या अनिकेत तेंडोलकर यांनी बंडखोरी करून भाजपच्या उमेदवारासमोर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या कारणास्तव त्यांचे सहा वर्षांसाठी शिवसेनेतून निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली आहे. दरम्यान, सुकळवाड पंचायत समितीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे संतोष गावडे हे निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी शिवसेना तसेच आमदार निलेश राणे यांचा पाठिंबा फक्त आणि फक्त संतोष गावडे यांना असून अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या प्रसाद मोरजकर यांच्याशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नाही. श्री. मोरजकर हे आपणाला निलेश राणे अगर दत्ता सामंत यांचा पाठिंबा असल्याचे सांगत असतील तर हे पूर्णतः चुकीचे असून शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी या फसवेगिरीला बळी पडू नये असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख पत्ता सामंत हे आपल्या कुंभारमाठ निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून आमचे उमेदवार धनुष्यबाण आणि कमळ या दोन निशाणीवर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केवळ या निशाणीवर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना आपले मतदान करायचे आहे. अनिकेत तेंडोलकर हे शिवसेनेमध्ये कार्यरत होते. त्यांनी भाजपच्या उमेदवारासमोर अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने पक्ष शिस्तीचा भंग केल्याने त्यांचे सहा वर्षासाठी निलंबन करण्यात येत आहे. शिवसेनेच्या झाराप मधील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवारासोबतच महायुतीचे काम करावे असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले आहे.
सुकळवाड पंचायत समिती मतदार संघात प्रसाद मोरजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना आमदार निलेश राणे यांनी फोन करून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली होती. मात्र यावेळी त्यांनी आपण शिवसेनेत नसल्याचे सांगितले. श्री. मोरजकर हे यापूर्वी उभाठामध्ये कार्यरत होते. खासदार नारायण राणे यांच्या निवडणुकीवेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र अद्याप ते शिवसेनेत आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्याचा कोणताही अधिकार शिवसेनेला नाही. मात्र काही ठिकाणी ते आपणाला आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पाठिंबा असल्याचे सांगत असल्याची चर्चा आपणापर्यंत आली आहे. अशाप्रकारे चर्चा होत असेल तर ती चुकीची आहे. प्रसाद मोरजकर यांना शिवसेनेने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेना तसेच आमदार निलेश राणे अथवा माझ्या नावाचा वापर करू नये. आमचा पाठिंबा भाजपचे उमेदवार संतोष गावडे यांनाच आहे असे दत्ता सामंत म्हणाले.

Subscribe to my channel




