‘गद्दारीचा कलंक’ म्हणताच निलेश राणेंचा वैभव नाईकांवर जोरदार हल्लाबोल!

हा तर २०२६ मधील सर्वात मोठा विनोद’; काँग्रेसपासून उबाठापर्यंतच्या राजकीय प्रवासावर राणेंची बोचरी टीका

मालवण : “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही,” या माजी आमदार वैभव नाईक यांच्या वक्तव्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून नाईक यांच्यावर जोरदार आणि बोचरी टीका केली आहे.“‘गद्दारीचा कलंक नको होता म्हणून उबाठा सोडली नाही’ हा २०२६ मधील सर्वात मोठा विनोद आहे,” असा थेट टोला निलेश राणे यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी शेवटच्या क्षणी निवडणूक अर्ज दाखल न केल्याचा मुद्दा उपस्थित करत राणे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.‘ज्या काँग्रेसने कुटुंबाला राजकीय बळ दिले, त्याच काँग्रेसला सोडून दुसऱ्या पक्षात गेले; मग निष्ठेच्या गप्पा कशासाठी?’ असा सवाल करत राणेंनी नाईक यांच्या राजकीय प्रवासावर निशाणा साधला.

इतकेच नव्हे, तर नाईक यांच्या सध्याच्या राजकीय प्रभावावरही राणेंनी थेट भाष्य केले. “आता जिल्ह्यात त्यांना कुठे उभे करत नाहीत, ग्रामपंचायतीतही पराभवाची परिस्थिती आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाईक यांच्या राजकीय ताकदीची खिल्ली उडवली.

नाईक यांच्या कुटुंबातील दोन भावांना नगरसेवक करण्यामध्ये आपली भूमिका असल्याचे स्पष्ट करत राणेंनी “उपकार विसरले, पण राजकारणातील निष्ठेच्या गोष्टी करतात,” अशी टीका केली.

यापुढे माझ्याबद्दल बोललात तर पदाधिकारी उत्तर देतील

आपण वैयक्तिक पातळीवर प्रत्येक वक्तव्याला उत्तर देणार नसल्याचे स्पष्ट करत निलेश राणे यांनी इशाराही दिला. “मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही. इथून पुढे काही बोलले तर माझे पदाधिकारी उत्तर देतील,” असे त्यांनी सुनावले.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी संबंधित राजकीय समीकरणांवरही राणेंनी नाईक यांना लक्ष्य केले. “रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव आहे, हे जगजाहीर आहे,” असा दावा त्यांनी केला.

error: Content is protected !!