मोटार बंद पडल्याने मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब तीन महिन्यांपासून बंद…

निष्काळजीपणाला जबाबदार कोण? ठाकरे शिवसेना नगरसेवक तपस्वी मयेकर यांचा सवाल

मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथे काल मध्यरात्री गॅरेजला लागलेल्या आगीत लाखोंची हानी झाली. या दुर्घटनेवेळी नगरपालिकेचा अग्निशमन बंब उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर केवळ मोटार बंद पडल्याच्या किरकोळ कारणामुळे हा बंब गेल्या तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत असल्याचे ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी म्हटले आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.

मालवण शहरात काल घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवणसाठी नवीन अग्निशामक बंब उपलब्ध झाला होता. मात्र, केवळ मोटार बंद पडल्याच्या किरकोळ कारणामुळे हा बंब गेल्या तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशामक सेवा ही अत्यावश्यक सेवा असून, पर्यटनाच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत असलेल्या मालवणसारख्या शहरात अग्निशामक बंब दीर्घकाळ बंद राहणे ही गंभीर बाब आहे. केवळ मोटार दुरुस्तीसारख्या किरकोळ कारणामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प राहणे ही प्रशासनासाठी नामुष्कीची बाब आहे.

माहितीनुसार, संबंधित अग्निशामक बंब मार्च २०२६ पासून बंद असून, त्याच्या दुरुस्ती किंवा पर्यायी बंब उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेने १७ एप्रिल २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला पत्रही पाठविले होते. यावरून हा प्रश्न तीन ते चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे स्पष्ट होते.जर एवढ्या किरकोळ खर्चामुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे अग्निशामक बंब बंद राहणार असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? काल घडलेली दुर्दैवी घटना पुन्हा घडली आणि त्यामागे नगरपालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, तर त्याला जबाबदार कोण राहणार? या प्रश्नांची उत्तरे मालवणच्या नागरिकांना मिळाली पाहिजेत, असे तपस्वी मयेकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!