खारेपाटण जि. प. मधून भाजपच्या प्राची इस्वलकर तर जानवली जि. प. मधून शिवसेनेच्या रुहिता तांबे बिनविरोध ; उबाठाच्या उमेदवारांची माघार


कणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर जानवली जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. येथील उबाठा गटाच्या उमेदवार हेलन जितेंद्र कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने हा जिल्हा परिषद मतदार संघ बिनविरोध झाला.
पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे ‘दे धक्का तंत्र’ सध्या केवळ मतदार संघातच नव्हे, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मीनल तळगावकर यांच्या माघारीच्या निर्णयामुळे ठाकरे सेनेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे शनिवार असूनही निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी कोण उमेदवार माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कालच या मतदार संघातील अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज ठाकरे शिवसेनेच्या एकमेव विरोधी उमेदवार मीनल तळगावकर यांनीही माघार घेतल्याने प्राची इस्वलकर या मतदार संघातील एकमेव उमेदवार राहिल्या. दरम्यान, ‘दे धक्का’ तंत्राचा मोठा फटका २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची पहिली जि. प. बिनविरोध
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानवली जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यानंतर महायुतीकडून निवडणूक लढवत असलेल्या रुहिता तांबे यांचा एकमेव उमेदवार म्हणून बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. या बिनविरोध निवडीमुळे जाणवली मतदारसंघात भाजप – शिवसेना महायुतीचे वर्चस्व अधिक दृढ झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिनविरोध निवड समजताच भाजप – शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी व समर्थकांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन केले.

Subscribe to my channel




